पुरी (ओदिशा) : भगवान जगन्नाथ यांच्या प्रसिद्ध रथयात्रेला मंगळवारी येथे प्रारंभ झाला. दरवर्षी यात्रेसाठी भाविकांची प्रचंड गर्दी असते ती मात्र यंदा कोरोना विषाणूच्या उद्रेकाला रोखण्यासाठी पाळाव्या लागणाऱ्या नियमांमुळे नाही. यात्रेसाठी अतिशय कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. प्रारंभी सर्वोच्च न्यायालयाने ही रथयात्रा कोविड-१९ मुळे स्थगित केली होती. न्यायालयाने आपल्या आदेशाचा फेरविचार करावा म्हणून करण्यात आलेल्या याचिकांवर न्यायालयाने यात्रेला सोमवारी सशर्त परवानगी दिली. गर्दी होऊ नये म्हणून पुरी जिल्ह्यात सोमवार ते बुधवारपर्यंत सकाळी नऊ ते दुपारी दोनपर्यंत संचारबंदीसारखे व्यवहार बंद ठेवण्याचा आदेश लागू केला गेला आहे, असे पोलीस महासंचालक अभय यांनी सांगितले.पोलिसांच्या ५० प्लाटून्स (३० जणांची एक प्लाटून) विविध ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत. नऊ दिवस हा रथयात्रा महोत्सव चालेल. पुरी शहरात येणारे सगळे प्रवेश बंद करण्यात आले आहेत. रथ ओढण्याचे काम करणारे पुजारी आणि पोलिसांची सोमवारी रात्री कोविड-१९ ची चाचणी करण्यात आली. ज्यांचे तपासणी अहवाल नकारात्मक आले त्यांनाच फक्त रथ ओढण्याची परवानगी दिली गेली.श्री जगन्नाथ मंदिराच्या सेवेकऱ्यांपैकी एक जण कोरोना विषाणूची लागण असलेला आढळला. त्याला कोविड-१९ रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. रथयात्रेसाठी या सेवेकºयांचीही चाचणी सक्तीने करून घेण्यात आली. १,१४३ सेवेकºयांची सोमवारी रात्री कोविड-१९ चाचणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात आली होती. एक अपवाद वगळता इतरांचे अहवाल नकारात्मक आले आहेत.।प्रतीकात्मक रथयात्राअहमदाबाद : भगवान जगन्नाथ मंदिर परिसरात मंगळवारी प्रतीकात्मक रथयात्रा काढण्यात आली. गुजरात उच्च न्यायालयाने राज्य सरकारची सार्वजनिक रथयात्रा काढण्याची मागितलेली परवानगी नाकारल्यामुळे ही प्रतीकात्मक रथयात्रा काढली गेली.१४३ वर्षांत यंदा प्रथमच ही रथयात्रा लोकांचा सहभाग, सेवेकरी यांच्या अनुपस्थितीत निघाली ती कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे.तत्पूर्वी, मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी सकाळी सोन्याच्या झाडूने रस्ता स्वच्छ करण्याचा ‘पाहिंद विधी’ केला. याच रस्त्याने जगन्नाथ, त्यांची बहीण सुभद्रा आणि बंधू बलराम त्यांच्या प्रवासाला प्रारंभ करतात.
पुरीत जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ, कडक बंदोबस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 3:47 AM