नवी दिल्ली : सीबीआयचे संचालक रणजित सिन्हा यांचा कार्यकाळ संपण्याला अवघे काही दिवस उरलेले असताना, केंद्र सरकारने रविवारपासूनच त्यांच्या वारसदार नियुक्तीची प्रक्रिया सुरूकेली आहे. सिन्हा यांचा कार्यकाळ २ डिसेंबरला समाप्त होणार आहे.सीबीआयचा नवा संचालक निवडण्यासाठी एक निवड समिती गठीत करण्यात येईल. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने ही समिती गठीत करण्याच्या उद्देशाने एक पॅनल स्थापन करण्यासाठी पात्रता पूर्ण करणाऱ्या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे मागविली आहेत, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. सीबीआयसाठी नोडल प्राधिकरण म्हणून काम करणाऱ्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने पुढचा सीबीआयप्रमुख निवडण्याची प्रक्रिया सुरु केली आहे आणि सिन्हा यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच नव्या सीबीआयप्रमुखाच्या नावाची घोषणा केली जाण्याची शक्यता या सूत्रांनी व्यक्त केली. लोकपाल कायद्यानुसार, केंद्र सरकार सीबीआयप्रमुखाची नियुक्ती पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील एका निवड समितीच्या शिफारशीच्या आधारावर करेल.(लोकमत न्यूज नेटवर्क)
नवीन सीबीआयप्रमुख निवड प्रक्रियेस प्रारंभ
By admin | Published: November 24, 2014 2:06 AM