- सद्गुरू पाटील, पणजी
नोटाबंदीमुळे देशातील भ्रष्टाचारीच घाबरले, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथील गोवा विधानसभेच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित सभेत केला.संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आदी व्यासपीठावर होते. कर्नाटकमध्ये एका काँग्रेस मंत्र्याच्या घरी छापा पडला तेव्हा १५० कोटींची रोकड नव्या नोटांच्या रूपात सापडली. मात्र त्या मंत्र्याविरुद्ध कर्नाटक सरकारने कोणतीही कारवाई केली नाही. गोव्यात अशा प्रकारचे भ्रष्टाचारी जर लोकांना नको असतील तर त्यांनी भाजपाला स्पष्ट बहुमत द्यावे. आपण पाच वर्षांत गोवा पूर्ण बदलून दाखवतो, अशी ग्वाही मोदी यांनी दिली. आम्ही देशातील पर्यटन क्षेत्राच्या विकासावर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. विदेशातून अधिकाधिक पर्यटक देशात यावेत म्हणून आम्ही काम करत आहोत. त्याचा सर्वाधिक लाभ गोव्याला होत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.गोव्याचा आदर्श : गोव्याला राजकीय अस्थिरतेचा शाप आहे. त्यामुळे ते मागे राहिले. मात्र, आता गोव्याचा विकास एवढ्या चांगल्या प्रकारे होत आहे, की देशातील मोठ्या राज्यांनादेखील त्यातून धडा शिकायला मिळत आहे. विरोधकांच्या प्रतिक्रिया तयारमोदी म्हणाले, नोटाबंदीचा लाभ देशातील गरिबांना, सामान्य लोकांना होईल. केंद्राचा अर्थसंकल्प जाहीर होण्याअगोदरच काही विरोधक व काही कथित अर्थतज्ज्ञ अर्थसंकल्प कसा अपयशी आहे, बेकार आहे ते दाखवून देण्यासाठी प्रतिक्रिया व भाषणांचा मसुदा तयार करू लागले आहेत. त्यांची पूर्वतयारी अगोदरच सुरू झाली आहे. अर्थसंकल्पाच्या नावाने विरोधात बोलले की मग गोवा, पंजाब, उत्तर प्रदेश, मणिपूर आदी राज्यांमध्ये केंद्रातील सरकारविरुद्ध चुकीचा संदेश जाईल, असे विरोधकांना वाटते.