लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशात गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे २७,५५३ नवे रुग्ण सापडले व २८४ जणांचा मृत्यू झाला. तसेच सक्रिय रुग्णांचा आकडा १ लाख २२ हजारांहून अधिक झाला आहे. ओमायक्राॅनने बाधित रुग्णांची संख्या १५२५ वर पोहोचली आहे. १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला आज, सोमवारपासून प्रारंभ होत आहे. त्यात त्यांना लसीचा पहिला डोस दिला जाईल.
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, एकूण रुग्णांच्या तुलनेत सक्रिय रुग्णांची आकडेवारी ०.३५ टक्के आहे. गेल्या चोवीस तासांत सक्रिय रुग्ण १८,०२० ने वाढले आहेत. ३ कोटी ४८ लाख ८९ हजार १३२ कोरोना रुग्णांपैकी ३ कोटी ४२ लाख ८४ हजार ५६१ जण बरे झाले. देशात नागरिकांना कोरोना लसीचे आतापर्यंत १४५.४४ कोटी डोस देण्यात आले.
१५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला आज, सोमवारपासून प्रारंभ होत असून, कोविन ॲपवर साडेतीन लाखांपेक्षा अधिक मुलांची नोंदणी झाली. देशात १५ ते १८ वर्षे वयोगटातील १० कोटी मुले असून, त्यांना देण्यात येणाऱ्या लसींमध्ये भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीचा समावेश असेल. मुलांना लसीच्या पहिल्या डोसनंतर २८ दिवसांनी दुसरा डोस दिला जाईल. मुलांना डोस देताना लसींची सरमिसळ होऊ नये म्हणून स्वतंत्र लसीकरण केंद्रे स्थापन करावीत, अशा सूचना केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी राज्यांना दिल्या आहेत.
ओमायक्रॉनचे ५६० रुग्ण बरे झालेओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या १५२५ झाली असून, त्यातील ५६० जण बरे झाले. या नव्या विषाणूचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून, त्यानंतर दिल्ली, गुजरात, तमिळनाडू, केरळ यांचा क्रमांक लागतो. नव्या विषाणूचा २३ राज्यांमध्ये प्रसार झाला. तिसऱ्या डोसमुळे वाढते प्रतिकारशक्तीकोरोना लसीचा तिसरा डोस हा बुस्टर डोस म्हणून दिला जातो. त्यामुळे ओमायक्रॉनच्या संसर्गाविरोधात लढण्याची माणसाची प्रतिकारशक्ती ८८ टक्क्यांनी वाढते, असे इंग्लंडमध्ये एका अभ्यासात आढळून आले आहे. लसीच्या दुसऱ्या डोसपेक्षा तिसऱ्या डोसने अधिक प्रमाणात संरक्षण मिळते, अशी माहिती संशोधक डॉ. एरिक टॉपोल यांनी दिली.
दिल्लीत तीन दिवसांत तिप्पट काेराेना रुग्णकेवळ तीन दिवसांत दिल्लीत काेराेना रुग्णांची संख्या तिपटीने वाढली असून, आता दिल्लीत काेराेना रुग्णांची संख्या ६३०६ वर पाेहाेचली आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी मात्र स्थिती चिंताजनक नसल्याचा दावा केला आहे.अचानकपणे गेल्या तीन दिवसांत दिल्लीत काेराेना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. २९ डिसेंबरला दिल्लीत नवे १३१३ काेराेना रुग्ण मिळाले हाेते. २ जानेवारीला दिल्लीतील काेराेना रुग्णांच्या संख्येने ६ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तरीही स्थिती चिंताजनक नसल्याचा दावा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकारांशी बाेलताना केला. रुग्णालयात दाखल हाेणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. आज दिल्लीत ३७ हजार ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. त्यापैकी केवळ ८२ रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली आहे.