ऑनलाईन लोकमत
चेन्नई, दि. ६ - मुसळधार पावसामुळे पाणी भरल्याने चार दिवसांपासून बंद असलेल्या चेन्नई विमानतळावरील हवाई वाहतूक पुन्हा एकदा सुरु झाली आहे. रविवारी सकाळी डीजीसीएने हिरवा कंदिल दाखवल्यानंतर चेन्नई विमानतळावरुन आधी चार्टर्ड विमानाने उड्डाण केले त्यानंतर १५० प्रवाशांना घेऊन एअर इंडियाच्या विमानाने पोर्टब्लेअरसाठी उड्डाण केले.
चेन्नई विमानतळावर सध्या फक्त दिवसाची हवाई वाहतूक सुरु रहाणार असल्याची माहिती आहे. धावपट्टीवर साचलेले पाणी काढण्यासाठी मोटरपंपाचा वापर करण्यात आला. शनिवारी फक्त मदत साहित्य घेऊन आलेल्या विमानांसाठी विमानतळ सुरु करण्यात आला होता. पावसाचे पाणी साचल्याने एएआयने सहा डिसेंबरपर्यंत विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला तेव्हा विविध हवाई कंपन्यांची ३४ विमाने चेन्नई विमानतळावर होती. चेन्नई विमानतळावरुन दररोज सरासरी ३२० विमानांचे लँण्डीग आणि टेकऑफ होते.
विमानसेवेप्रमाणे चेन्नईमधून आता रेल्वेसेवाही सुरु झाली आहे. चेन्नईच्या अनेक भागातून पाणी ओसरल्यानंतर आता खंडीत झालेला विद्युत पुरवठा पूर्ववत झाला आहे. आता मदतसाहित्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे आणि साथीचे आजार पसरण्यापासून रोखण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.