नवी दिल्ली : देशातील राजकीय पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही एकमेकांच्या विरोधात रणनीती बनवण्यासाठी बैठका घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर एनडीएच्या खासदारांच्या ११ ग्रुपच्या बैठकांची मालिका उद्या म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहे. पहिल्या दिवशी एनडीएच्या खासदारांच्या दोन ग्रुपची बैठक होणार आहे. या बैठकीत खासदारांकडून त्यांच्या भागातील समस्यांसह विकासकामांची माहिती घेतली जाणार असून योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे.
संध्याकाळी ६.३० वाजता दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदन येथे पहिल्या ग्रुपची बैठक होणार आहे. ज्यामध्ये पश्चिम उत्तर प्रदेश, ब्रज क्षेत्र, कानपूर क्षेत्र आणि बुंदेलखंडमधील ४२ खासदार उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह पक्षाचे अनेक बडे नेते उपस्थित राहू शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत खासदारांना भविष्यातील रणनीतीबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात येणार आहेत.
दुसरी बैठक संध्याकाळी ७.३० वाजता संसद भवन संकुलात होणार आहे. ज्यामध्ये तीन राज्यांतील (ओडिशा, झारखंड आणि बंगाल) ४१ खासदार उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत. आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तयारीबाबत समन्वयासाठी आयोजित करण्यात आलेल्या या दोन्ही बैठकांना पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीमध्ये एकूण ३३८ खासदारांचे एकूण ११ ग्रुप तयार करण्यात आले आहेत आणि प्रत्येक ग्रुपमध्ये सुमारे ३०-४० खासदार आहेत. खासदारांचे हो ग्रुप्स प्रादेशिक तत्त्वावर तयार करण्यात आले आहेत. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी या खासदारांकडून त्यांच्या भागातील समस्या आणि विकासकामांबाबत अभिप्राय घेतील आणि योग्य मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत.
एनडीएची बैठकीत ३८ पक्षांचे नेते झाले होते सहभागीनुकतीच एनडीएची बैठक झाली, ज्यामध्ये एकूण ३८ पक्षांचे नेते सहभागी झाले होते. या बैकठीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित करत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला होता. नरेंद्र मोदी म्हणाले होते की, विरोधक आमचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण देशातील जनता सर्व काही पाहत आहे. विरोधक का एकत्र येत आहेत, हे त्यांचे ध्येय नसून मजबुरी आहे, हे जनतेला माहीत आहे.