मुंबई - कोरोनामुळे गेल्या 1.5 वर्षांपासून देशातील शाळा बंदच आहेत. अद्यापही शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबत निर्णय झाला नाही. मात्र, आता शाळा सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. महाराष्ट्रात 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. तर, दुसरीकडे राजस्थानध्ये इयत्ता पहिलीपासूनची शाळाही सुरू करण्यात आली आहे.
राजस्थानच्याजयपूरमध्ये इयत्ता 1 ली ते 5 वी पर्यंतचे वर्ग भरविण्यात आली आहे. कोविड नियमावलींचे पालन करण्याच्या सूचना देत येथील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. येथील एमजीजीएस शाळेच्या मुख्याध्यापिका उर्वशी खुराना यांनी म्हटले की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सर्व यंत्रणा उभारली आहे. आम्ही नियमावलींचे पालन करत आहोत. तसेच, विद्यार्थ्यांनाही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. एकमेकांसोबत जेवणाचा डब्बा शेअर न करण्याचेही त्यांना बजावल्याचे खुराना यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी दिली परवानगी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळा सुरू करण्याचा शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. कोरोनाच्या नियमांचं पालन करून शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड यांनी दिली. शाळा सुरू कराव्या अशी शिक्षण तज्ज्ञांची आणि पालकांचीही मागणी होती. शाळांमध्ये येण्यासाठी पालकांची संमती असणं आवश्यक असणार आहे. तसंच विद्यार्थ्यांना अटेडन्सची कोणतीही सक्ती केली जाणार नसल्याचं स्पष्टीकरण वर्षा गायकवाड यांनी दिलं.
शाळा सुरू, पण खेळांना परवानगी नाही
ग्रामीण भागात इयत्ता ५ वी ते १२ वी आणि शहरी भागात ८वी ते १२ वीचे वर्ग सुरु होणार असल्याचे माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. शाळा सुरू झाल्या तरी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं लागणार आहे. याशिवाय टास्क फोर्सनं दिलेल्या सर्व सूचनांचं पालन करण्यात येईल. प्रत्येक शाळांना आरोग्य केंद्राशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. याशिवाय विद्यार्थी आणि शिक्षकांसाठीही एसओपी तयार केली जाणार असून शाळांमध्ये कोणत्याही खेळांना परवानगी नसेल.