नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच आता आणखी एका रहस्यमयी आजाराने थैमान घातले आहे. यामध्ये अंगावर काळे चट्टे पडतात आणि नंतर मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. पश्चिम उत्तरप्रदेशातील मथुरा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून स्क्रब टायफस (Scrub Typhus) या रहस्यमयी रोगाची दहशत निर्माण झाली आहे.
स्क्रब टायफसची माहिती मिळताच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या असून आता गावागावांमध्ये जाऊन लोकांची तपासणी सुरू झाली आहे. आतापर्यंत 12 जणांना स्क्रब टायफसची बाधा झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच आसामच्या गुवाहाटी येथे एका कोविड सेंटरमधील लोकांना स्क्रब टायफसची बाधा झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे हे कोविड सेंटर बंद करण्याची वेळ ओढावली होती. या सेंटरमध्ये तब्बल 29 जणांना स्क्रब टायफसची बाधा झाली होती. कोविड सेंटरमधील डॉक्टर्स आणि कर्मचारीही स्क्रब टायफसच्या विळख्यातून सुटले नव्हते.
काय आहे स्क्रब टायफस?
स्क्रब टायफस हा आजार ओरियेंटिया सुटसुगमुशी नावाच्या जीवाणुमुळे होतो. संक्रमित कीटक चावल्याने स्क्रब टायफसचा प्रसार होतो. या रोगाची लक्षणे साधारण चिकनगुनियाच्या आजारासारखी असतात. मात्र, स्क्रब टायफस अधिक घातक असल्यामुळे रुग्णाचा मृत्यू ओढावण्याची शक्यता जास्त असते. या रोगापासून वाचवण्यासाठी कपडे आणि अंथरूणावर परमेथ्रिन आणि बेंझिल बेंझोलेट शिंपडावे. तसेच लक्षणं आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
स्क्रब टायफसची लक्षणं काय?
स्क्रब टायफसच्या प्रमुख लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी आणि अंगदुखीचा समावेश आहे. तसेच रोगाची लागण झाल्यास तुमच्या अंगावर काळे चट्टे उठतात. अनेकांच्या अंगावर सूज येण्याचीही शक्यता आहे.
स्क्रब टायफस या रोगावर सध्या कोणतीही लस उपलब्ध नाही. केवळ संक्रमित व्यक्तीपासून दूर राहणे, हा एकमेव यापासून स्वत:चा बचाव करण्याचा मार्ग आहे. त्यामुळे या रोगाचे संक्रमण झाल्यास सोशल डिस्टन्सिंग पाळणे अत्यंत गरजेचे आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.