नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच दुसरीकडे कोट्यवधींचे रोजगारदेखील धोक्यात आले आहेत. अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या क्षेत्रांवर कोरोनामुळे प्रचंड मोठं संकट निर्माण झालं. त्यामुळे कित्येकांच्या डोक्यावर बेरोजगारीची टांगती तलवार आहे. अनेकांना रोजगार देणाऱ्या प्रमुख क्षेत्रांना कोरोनाचा थेट फटका बसला आहे. याच दरम्यान आता वर्षभरात स्टार्टअप्समधील तब्बव 10 हजार जणांनी नोकरी गमावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील स्टार्टअप उद्योगांसाठीचे चांगले दिवस संपल्याचं म्हटलं जात आहे.
एका रिपोर्टनुसार, या वर्षात स्टार्टअप कंपन्यांकडून 10 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीमधून कमी करण्यात आले आहे. यामध्ये मोठ्या दिग्गज, लोकप्रिय स्टार्टअप कंपन्यांचा समावेश आहे. ब्लिंकिट, यादी, एमपीएल, ओला, कार्स 24, वेदांतु, लिडो, रुपीक, एमफाइन, फार्मईजी, फारआयसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. मागील काही काळापासून स्टार्टअप समोर निधीची चिंता सतावू लागली आहे. त्यामुळे कंपनीच्या आगामी वाटचालीसाठी नवीन रणनीती आखण्यावर विचार सुरू झाला आहे. काही गुंतवणुकदारांकडून स्टार्टअप संस्थापकांसोबत चर्चा सुरू आहे.
वर्ष 2022 मध्ये आर्थिक संकट निर्माण झाले आहे. यामध्ये कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर झाला आहे. जगभरातील शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर घसरण सुरू आहे. बाजारात विक्रीचा दबाब वाढला असून गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक काढली जात आहे. स्टार्टअप कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर निधीचा तुटवडा जाणवत आहे. स्टार्टअपमधील गुंतवणूक ही कमी होत आहे.
पहिल्या तिमाहीत भारतीय स्टार्टअप कंपन्यांना 11.7 अब्ज डॉलरची गुंतवणूक मिळाली. या दरम्यान, 13 युनिकॉर्न निर्माण झाले आहेत. एप्रिल महिन्यात 3.4 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यात आली. आतापर्यंत 27 भारतीय स्टार्टअप्सने 10,029 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केलं आहे. यामध्ये कार्स 24, मीशो, ओला, एमपीएल, ट्रेल, वेदांतु आदी युनिकॉर्नचा समावेश आहे. मे महिन्यात 9 स्टार्टअपद्वारे नोकर कपातीची नोटीस देण्यात आली होती. मे महिन्यात 3379 कर्मचाऱ्यांचे रोजगार हिरावला. जून महिन्यात आतापर्यंत 10 स्टार्टअप्सने कर्मचारी कपात केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.