मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं ग्राहकांच्या एका क्षुल्लक चुकीतून तब्बल 39 कोटी रुपयांची कमाई केली आहे. स्टेट बँकेनं चेकवर योग्य स्वाक्षरी नसल्यानं ग्राहकांकडून गेल्या 40 महिन्यांमध्ये दंडाच्या माध्यमातून 39 कोटी रुपये कमावले आहेत. चेकवर योग्य स्वाक्षरी नसल्यानं स्टेट बँकेनं गेल्या 40 महिन्यांमध्ये 24 लाख 71 हजार 544 चेक परत पाठवले आहेत. एका आरटीआयमुळे ही आकडेवारी पुढे आली. आरटीआयमधून मिळालेल्या माहितीनुसार, एखादा चेक परत पाठवल्यावर बँक ग्राहकाकडून 150 रुपयांचा दंड आकारते. यावर जीएसटीदेखील लावला जातो. त्यामुळे ग्राहकाला 157 रुपये मोजावे लागतात. एकीकडे ग्राहकांना दंड भरावा लागत असताना, यामुळे बँकेच्या तिजोरीत मात्र कोट्यवधी रुपयांची भर पडली आहे. याशिवाय खात्यात किमान रक्कम न ठेवल्यानंही एसबीआयनं ग्राहकांकडून दंड आकारणी केली आहे. जानेवारीत अर्थ मंत्रालयानं या संदर्भातील माहिती दिली होती. गेल्या एप्रिल ते नोव्हेंबर महिन्यात खात्यात किमान रक्कम न ठेवल्यानं एसबीआयनं ग्राहकांकडून 1771 कोटी रुपयांचा दंड वसूल केला होता. 2015-16 या आर्थिक वर्षात एसबीआयनं 60 हजार 169 चेक परत पाठवले. 2016-17 या कालावधीत या संख्येत मोठी वाढ झाली. या काळात एसबीआयनं जवळपास 1 लाख चेक ग्राहकांना परत पाठवले. 2016-17 या आर्थिक वर्षात यामध्ये थोडी घट झाली. या वर्षात 80 हजार चेक बँकेनं ग्राहकांना परत केले. 2018-19 या आर्थिक वर्षात यामध्ये पुन्हा वाढ झाली. एप्रिलपर्यंत स्टेट बँकेनं 83 हजार 132 चेक ग्राहकांना परत पाठवले आहेत.
खातेधारकांच्या 'या' क्षुल्लक चुकीमुळे स्टेट बँकेनं 40 महिन्यात कमावले 39 कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2018 5:19 PM