नवी दिल्ली : आखाती व युरोपीय देशांना बासमती तांदळाची निर्यात करणाऱ्या हरियाणातील एका कंपनीस स्टेट बँक आॅफ इंडियासह सहा सरकारी बँकांच्या ‘कन्सॉर्शियम’ने दिलेले ४११ कोटी रुपयांचे कर्ज बुडविल्याप्रकरणी ‘सीबीआय’कडे फिर्याद दाखल केली जाण्यापूर्वीच त्या कंपनीचे संचालक देश सोडून पसार झाले असल्याची माहिती समोर आली आहे.मे. राम देव इंटरनॅशनल या कंपनीस स्टेट बँकेखेरीज कॅनरा बँक, युनियन बँक आॅफ इंडिया, आयडीबीआय, सेंट्रल बँक आॅफ इंडिया व कॉपोर्रेशन बँक या बँकांनी मिळून हे कर्ज दिले होते. यात स्टेट बँकेने दिलेल्या कजार्चा वाटा १७३ कोटी रुपयांचा होता. हे कर्ज २७ जानेवारी २०१६ रोजी बुड्त खात्यात टाकण्यात आले. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे यंदाच्या २० फेब्रुवारी रोजी स्टेट बँकेने या संदर्भात ‘सीबीआय’कडे फिर्याद दाखल केली.या कंपनीने हरियाणाच्या कर्नाल जिल्ह्यात आपल्या भाताच्या तीन गिरण्या, तांदळाची प्रतवारी व पॅकिंग करण्याची आठ केंद्रे व सौदी अरबस्तान व दुबईमध्ये कार्यालये असल्याची माहिती दिली होती. कर्ज बुडीत खात्यात गेल्यानंतर सात-आठ महिन्यांनी बँकांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी केली असता भात सडण्याच्या गिरणीतील सर्व यंत्रसामग्री तेथून हलविण्यात आली आहे.सीबीआयमधील सूत्रांनी सांगितले की, चौकशी केली असता या कर्जदार कंपनीचे प्रवर्तक संचालक नरेश कुमार, सुरेश कुमार व संगीता हे तिघेही फिर्याद दाखल होण्याच्या आधीच देशातून परागंदा झाल्याची माहिती मिळाली. फिर्याद दाखल झाल्यावर लगेचच ‘लॉकडाऊन’ सुरू झाल्याने धाडी वगैरे टाकता आल्या नाहीत. आता कोर्टाकडून समन्स काढूनही आरोपी हजर झाले नाहीत तर पुढील कायदेशीर कारवाई करावी लागेल.
४११ कोटींचे कर्जबुडवे फरार झाल्यावर स्टेट बँकेची तक्रार, ‘लॉकडाऊन’मुळे सीबीआय तपास थंडावला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 1:50 AM