नवी दिल्ली: दिल्लीतील प्रदूषणात वाढ होत असून हवेची गुणवत्ता ही आणखी खालावली आहे. प्रदूषणात वाढ झाल्याने श्वास घेणं ही लोकांसाठी कठीण झालं आहे. वायू गुणवत्ता खराब श्रेणींमध्ये आली असून येत्या काही दिवसांत ती आणखी खालावण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिल्लीतील प्रदूषणाच्या समस्यावर लोकसभेत आज चर्चा झाली. यावेळी भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू व भाजपाचे खासदार गौतम गंभीर देखील उपस्थित होता. गेल्या काही दिवसांआधी गंभीरला दिल्ली प्रदुषण संर्दभातील बैठकीला दांडी मारल्याने त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत होते. मात्र जनतेने आपल्याला वाद करण्यासाठी नाहीतर त्यांची कामं करण्यासाठी निवडून दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
गौतम गंभीर म्हणाला की, आपण आपल्या जाती, धर्म, वय आणि धर्म विचार न करता सर्वांवर प्रदूषणाचा परिणाम होत असतो. त्यामुळे या विषयावर राजकारण करणं थांबवायला हवे. तसेच राज्यात सम- विषम आणि बांधकामांवर बंदी घालण्यासारखे उपाय प्रदूषण थांबवू शकत नसल्याचे देखील गंभीरने आपल्या भाषणात सांगितले.
दिल्लीतील हवेचा प्रदुषणाचा स्तर दिवसेंदिवस विषारी होत चालला आहे. यासाठी दिल्ली सरकारने राज्याचे सर्व खासदार व एमसीडी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र गौतम गंभीर भारत विरुद्ध बांगलादेशच्या कसोटी साम्यात समालोचनची भूमिका निभावतो आहे. याच दरम्यान भारतीय संघाचा माजी क्रिकेटर व्ही व्ही एस लक्ष्मण आणि निवेदक जतिन सप्रू यांच्यासोबत इंदूरमध्ये जिलेबीवर ताव मारतानाचा गंभीरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याला ट्रोल करण्यात आले होते.
दरम्यान, दिल्लीजवळील राज्यांमध्ये शेतकऱ्यांकडून पराली जाळली जात असल्याने दिल्लीतील हवेची गुणवत्ता बिघडली असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले होते. तर, केंद्र सरकारच्या वायू गुणवत्ता व हवामान अंदाज प्रणाली व अनुसंधान (सफर) या संस्थेने हवेची गुणवत्ता खराब होण्यासाठी हवामानामध्ये होणारे बदल कारणीभूत असल्याचा दावा केला होता.