कोलकाता : राज्यांनी रोहिंग्या निर्वासितांना ओळखून त्यांचा बायोमेट्रिक तपशील गोळा करावा, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी सांगितले. राज्यांनी गोळा केलेला बायोमॅट्रिक तपशील केंद्र सरकार म्यानमारला हा प्रश्न सोडवण्यासाठी राजदूताच्या माध्यमातून पाठवील, असे ते म्हणाले.
रोहिंग्यांच्या प्रश्नावर राज्यांना आम्ही आधीच सल्ला दिलेला आहे. त्यांनी रोहिंग्यांना ओळखावे आणि त्यांचा बायोमेट्रिक तपशील गोळा करावा, असे राज्यांना सांगितले आहे, असे सिंह पूर्व विभागीय परिषदेच्या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना म्हणाले. आंतरराज्य संबंध, माओवाद्यांच्या उपद्रवासह सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी सिंह यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेची २३ वी बैठक पार पडली. बैठकीस पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास उपस्थित होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी आपले प्रतिनिधी बैठकीसाठी पाठवले होते. राज्यांना केंद्राकडून सुरक्षादलांची गरज असल्याचे मान्य करून राजनाथ सिंह यांनी त्यांना त्यांच्या गरजेनुसार सुरक्षादले केंद्र सरकार उपलब्ध करून देईल, असे सांगितले.