काँग्रेसची अवस्था निराशाजनक, लोकसभेच्या ३०० जागा जिंकणेही दुरापास्त; गुलाम नबी आझाद यांचं मत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 07:11 AM2021-12-03T07:11:02+5:302021-12-03T07:11:30+5:30
Congress News: देशात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘यूपीए’ आहेच कुठे या तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या विधानाने काँग्रेसचे अनेक नेते संतप्त झाले आहेत.
नवी दिल्ली : देशात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘यूपीए’ आहेच कुठे या तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या विधानाने काँग्रेसचे अनेक नेते संतप्त झाले आहेत. मात्र, गुलाम नबी आझाद यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी चांगली नसेल, असे स्पष्ट प्रतिपादन केले आहे. ही स्थिती कायम राहिल्यास काँग्रेसला २०२४ मध्ये लोकसभेच्या ३०० जागाही जिंकता येणार नाहीत, असे आझाद म्हणाले. काँग्रेसची ही स्थिती निराशाजनक आहे, या शब्दांत त्यांनी पक्षाला घरचा अहेर दिला.
...तर आघाडी अशक्य
भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांची आघाडी आमच्याविना होणारच नाही, असा दावा काँग्रेसचे कपिल सिब्बल व दिग्विजय सिंह, मल्लिकार्जुन खरगे, अधिर रंजन चौधरी या ज्येष्ठ नेत्यांनी केला आहे.
दैवी अधिकार नाही : प्रशांत किशोर
गेल्या १० वर्षांत काँग्रेस ९० निवडणुकांत पराभूत झाला आहे. पण सर्व विरोधी पक्षांचे नेतृत्व करण्याचा दैवी अधिकार आपल्याला आहे, असे काँग्रेसला जे वाटते. ते चुकीचे आहे, असे तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस प्रशांत किशोर म्हणाले.
यूपीएच्या मजबुतीसाठी राहुल गांधी प्रयत्नशील संजय राऊत यांचा दावा
मुंबई : यूपीएच नाही तर, एनडीएही अस्तिवात नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भेटून मी सांगितले आहे की, यूपीएला ताकद दिली पाहिजे. यूपीएमध्ये नवे मित्र आणले पाहिजेत. त्या दृष्टीने राहुल पावले टाकत आहेत, असा दावा शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी लोकमत DIA (डिजिटल इन्फ्लुएन्सर ॲवॉर्ड) पुरस्कार सोहळ्यात केला.