ऑनलाइन लोकमत
चंदिगड, दि. 23 - पंजाबमध्ये महामार्गावर 500 मीटर अंतराच्या आत दारुविक्री करण्यास परवानगी मिळाली आहे. विधानसभेत शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाला मान्यता देत पंजाब अबकारी कर अधिनियमात दुरुस्ती करण्यास मंजुरी देण्यात आली. महामार्गावर 500 मीटरच्या आत असणारे परमीट रुम, वाईन शॉप, बीयरशॉपी, देशी दारूचे दुकाने हटविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. मात्र पंजाब सरकारच्या निर्णयामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्लब मालकांना दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी गेल्या शनिवारी नव्या अबकारी धोरणला मंजुरी दिली होती. सरकारच्या नव्या योजनेनुसार राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर 500 मीटरच्या आत दारुविक्री करण्यास बंदी असेल, मात्र ही बंदी हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्लबना लागू नसेल.
मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी विधानसभेत सांगितलं होतं की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर 500 मीटर अंतराच्या आत दारुच्या दुकानांवर बंदी असेल, मात्र ही बंदी रेस्टॉरंट, हॉटेल आणि क्लब यांना लागू होणार नसून त्यांनी सूट मिळेल.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पंजाब आणि अन्य राज्यांच्या महसूलावर प्रभाव पडला होता. यामुळे पंजाब सरकारने हा निर्णय घेतला होता. महामार्गांवर होणारे अपघात पाहता सर्वोच्च न्यायालयाने महामार्गावर दारुविक्री बंदी करण्याचा निर्णय दिला होता.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने देशभरातील महामार्गांवर पाचशे मीटरच्या परिसरात दारूची दुकाने बंद झाली. मात्र, पंजाबमध्ये महामार्ग आणि आसपासचे हॉटेल, बार लवकरच पुन्हा दारू विक्री करू शकतील यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरु केले होते. राज्य सरकारने त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या दारूविक्री बंदीतून बाहेर काढण्याचा मार्ग तयार केला होता. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंजाब उत्पादन शुल्क कायद्याच्या कलम २६ अ मध्ये सुधारणा करण्यास हिरवा कंदिल दाखविण्यात आला.