मुंबई - सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आणि बॉलिवूडमधील ड्र्ग्स रॅकेट यावरून कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यात रंगलेल्या आरोप-प्रत्यारोपानंतर आता ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन आणि कंगना राणौतबॉलिवूडवरून आनेसामने येताना दिसत आहेत. बॉलिवूडला बदनाम करण्याचं कारस्थान रचण्यात येत असून, खाल्ल्या ताटाला भोक पाडण्याचं काम काही लोक करत असल्याचा आरोप जया बच्चन यांनी राज्यसभेत केला होता. जया बच्चन यांच्या या ज्वलंत भाषणानंतर बच्चन कुटुंबीयांना राज्य सरकारकडून पॅरामीटर सुरक्षा देण्यात येत आहे, टाईम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
अभिनेत्री कंगना राणौत हिनं बॉलिवूड माफिया आणि ड्रग्स कनेक्शन हा मुद्दा ऐरणीवर आणला. अभिनेत्री रिया चक्रवर्तीसह आतापर्यंत १० पेक्षा अधिक जणांना एनसीबीने ड्रग्स प्रकरणात अटक केली आहे. त्यामुळे बॉलिवूड आणि ड्रग्स यांचं कनेक्शन आता उघड होऊ लागलं आहे. मात्र बॉलिवूडला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे असा आरोप खासदार जया बच्चन यांनी केला होता. त्यानंतर, जया बच्चन यांना काही जणांकडून जाणीवपूर्वक ट्रोल करण्यात येत आहे. तर, कंगानाने जया बच्चन यांना प्रत्युत्तर देताना पुन्हा एकदा बॉलिवूड इंडस्ट्रीतील मीटू प्रकरणावर बोट ठेवले. ड्रग्जमाफियांचा हा मुद्दा ऐरणीवर असल्याने, बच्चन कुटुंबीयांना राज्य सराकारकडून सुरक्षा देण्यात येत आहे.
बच्चन कुटुंबीयांना सोशल मीडियातून धकम्या देण्यात येत असून ट्विटरवर जया बच्चन शेम ऑन असा हॅशटॅगही ट्रेंड होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने, अभिषेक, ऐश्वर्य, आराध्या आणि जया बच्चन यांच्या बंगल्याबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून ही सुरक्षा देण्यात आली असून, यात कुठलिही विशेष सुरक्षा मिळणार नाही.
जया बच्चन यांना कंगनाचा टोला
जया बच्चन यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना केलेल्या ट्विटमध्ये कंगना म्हणाली की, जया बच्चन आणि त्यांच्या इंडस्ट्रीने मला कुठले ताट दिले आहे. एक ताट मिळाले होते ज्यामध्ये दोन मिनिटांचा आयटम्स नंबर्स आमि एका रोमँटिक सीनचा रोल मिळायचा तोसुद्धा हिरोसोबत शय्यासोतबत केल्यानंतर. त्यानंतर मी या इंडस्ट्रीला फेमिनिझम शिकवला. तसेच हे ताट देशभक्ती आणि स्त्रीप्राधान्य असलेल्या भूमिकांना सजवले. जयाजी हे माझे स्वत:चे ताट आहे, असा टोला कंगनाने लगावला.
खासदार रवी किशन लोकसभेत काय म्हणाले?
एकीकडे सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाच्या तपासाला वेगळीच दिशी मिळाली असून ड्रग्ज तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामध्ये बॉलिवूड कलाकारांचा सहभाग असल्याची चर्चा सुरू असून अधिक तपास सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर अभिनेता आणि खासदार रवी किशन यांनी सभागृहात हा मुद्दा उचलून धरला. देशात पाकिस्तान व चीनमधून नशिल्या पदार्थांची तस्करी होत आहे. देशातील तरुण पीढीला उदध्वस्त करण्याचा हा डाव असल्याचे सांगत याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी रवि किशन यांनी केली आहे. बॉलिवूड किंवा फिल्म इंडस्ट्रीत ड्रग्ज रॅकेटचा शिरकाव झाल्याचे सांगत, एनसीबीकडून तपास सुरू असल्याचेही ते म्हणाले. मात्र, याप्रकरणी कडक कारवाई करण्यात यावी, असेही खासदार रवी किशन यांनी म्हटले.