मध्य प्रदेशात पाच बाबा-महाराज बनले राज्यमंत्री, राज्य सरकारचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 05:55 AM2018-04-05T05:55:06+5:302018-04-05T05:55:06+5:30
वर्षाअखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकारने पाच हिंदू धार्मिक नेत्यांना मंगळवारी राज्यमंत्रिपदाचा दर्जा बहाल केला. नर्मदानंद महाराज, हरिहरानंद महाराज, कम्प्युटर बाबा, भय्यू महाराज व पंडित योगेंद्र महंत यांना नर्मदा नदीच्या संवर्धन समितीवर नियुक्त करून, त्यांना सरकारने राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला आहे.
भोपाळ - वर्षाअखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकारने पाच हिंदू धार्मिक नेत्यांना मंगळवारी राज्यमंत्रिपदाचा दर्जा बहाल केला. नर्मदानंद महाराज, हरिहरानंद महाराज, कम्प्युटर बाबा, भय्यू महाराज व पंडित योगेंद्र महंत यांना नर्मदा नदीच्या संवर्धन समितीवर नियुक्त करून, त्यांना सरकारने राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला आहे.
लोकांच्या धार्मिक भावनांचा राजकीय लाभासाठी वापर करून घेण्याचा भाजपाचा हा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा स्वत:च पापांतून मुक्त व्हायचा प्रयत्न आहे. नर्मदेच्या संवर्धनाकडे चौहान यांनीच दुर्लक्ष केले आहे. राज्य सरकारने नदीच्या काठावर सहा कोटी झाडे लावल्याचा दावा असून, संतांनी ती झाडे शोधून काढावीत, असे काँग्रेसचे प्रवक्ते पंकज चतुर्वेदी म्हणाले.
भाजपाचे प्रवक्ते रजनीश अग्रवाल यांनी मात्र काँग्रेसला संतांविषयी आदर आवडत नाही, असे म्हटले आहे. नर्मदेचे संवर्धन व पर्यावरणाचे काम करता यावे, यासाठी संतांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला आहे, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
माझ्या कामाचे बक्षीस मिळाले
कम्प्युटर बाबा म्हणाले की, राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला गेला, यात चूक काय आहे? आमच्या कामाचे आम्हाला बक्षीस मिळाले आहे. कम्प्युटर बाबाने नर्मदा नदीच्या संवर्धन कामात झालेल्या प्रचंड भ्रष्टाचाराला उघड करण्यासाठी, या आधी नर्मदा घोटाळा रथयात्रा काढण्याची घोषणा केली होती.
पंडित योगेंद्र महंत : मध्य प्रदेशात सुरू असलेल्या नर्मदा भ्रष्टाचार आंदोलनाचे पंडित योगेंद्र महंत समन्वयक आहेत. नदी संवर्धनात सरकारने मोठा भ्रष्टाचार केल्याचा व वनीकरणासाठी निर्धारित केलेला निधी सरकारने इतर कामांसाठी वापरल्याचा आरोप त्यांनी केला होता. अमेरिकेतून चालविल्या जाणाºया विश्व ब्राह्मण संघाच्या मध्य प्रदेश शाखेचे ते अध्यक्ष आहेत, अशी माहिती त्यांच्या फेसबुक पेजवर दिलेली आहे.
हरिहरानंद महाराज : मध्य प्रदेश सरकारने सुरू केलेल्या ‘नमामी देवी नर्मदे सेवा यात्रा’ उपक्रमातील हरिहरानंद महाराज हे प्रमुख नेते आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सुरू केलेल्या या यात्रेने ३,३४४ किलोमीटरचा प्रवास करीत, १,१०० गावांना भेटी दिल्या आहेत. मे २०१७ मध्ये या यात्रेचा समारोप झाला.
भय्यूजी महाराज
मूळ नाव उदयसिंग देशमुख. यांनी पूर्वी मॉडेलिंग केले आहे. त्यांचा अत्याधुनिक सोयी असलेला सूर्याेदय आश्रम इंदूरमध्ये आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिवंगत विलासराव देशमुख, शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, गायिका लता मंगेशकर, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, मिलिंद गुणाजी आदींनी आश्रमाला भेट दिली आहे. अनेक ज्येष्ठ नेते यांचा सल्ला घेतात. त्यांची स्वत:ची वेबसाइट आहे. अण्णा हजारे यांच्या २०११ सालच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात ते सहभागी होते. एका अभिनेत्याने केलेल्या फसवणुकीच्या आरोपामुळे ते वादात सापडले होते.
कम्प्युटर बाबा : यांचे मूळ नाव आहे, स्वामी नामदेव त्यागी. आपला मेंदू कम्प्युटरपेक्षा अधिक वेगाने चालतो, असा यांचा दावा आहे. ते टेक्नोसॅव्ही आहेत. गेल्या वर्षी त्यांनी मंदिराच्या कारभारात मध्य प्रदेश सरकार ढवळाढवळ करीत असल्याचा आरोप केला होता. त्यांना २०१४च्या कुंभमेळ्यात हेलिकॉप्टर उतरविण्याची परवानगी मिळाली होती. नर्मदा संवर्धनाच्या कामातील भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी ‘नर्मदा घोटाळा रथयात्रा’ काढण्याच्या तयारीत असतानाच ते राज्यमंत्री झाले आहेत.
नर्मदानंद महाराज : हे महाराज हनुमानाचे कट्टर भक्त आहेत. रामनवमीसारख्या सणानिमित्त महाराज दरवर्षी राज्यभर भव्य रॅलींचे आयोजन करीत असतात. या रॅलींना लाभत असलेल्या प्रतिसादामुळे ते संपूर्ण मध्य प्रदेशात लोकप्रिय असल्याचे सांगण्यात येते.