रांची : झारखंडची राजधानी रांचीमध्ये आज भाजपाच्या राज्यस्तरावरील नेत्यांनी प्रदेश कार्यालयाचा मागचा दरवाजा उघडण्यास नकार दिल्याने पोलिसाला जबर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलीस शिवपूजन यादव हा त्यांच्यापासून बचावासाठी गार्ड रुमपर्यंत पळाला मात्र, तेथे जात अन्य पोलीस कर्मचाऱ्यांसमोर त्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
भाजपा युवामोर्चाचे प्रदेश अध्यक्ष अमित सिंग, उपाध्यक्ष अभिषेक सिंग, महामंत्री राज सिन्हा यांच्यासह अन्य़ काही जणांनी यादवला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांनी यादवला मध्यस्थी करत सोडविले. यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. पोलिसांनी भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अमित सिंह, उपाध्यक्षांसह 10 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत आहे. तर अमित सिंह यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
पोलीस शिवपूजन यादवने पोलिसांना सांगितले की, दुपारी अडीच वाजता अमित सिंह यांच्यासह अन्य लोकांनी कार्यालयाचा मागचा गेट उघडण्यासाठी दबाव आणला. मात्र, गेट उघडण्यास नकार दिला तरीही ते जबरदस्ती करू लागले. तेथील प्रभारी हेमंत दास यांनी त्यांच्या परवानगीशिवाय मागचे गेट न उघडण्याचा आदेश दिला होता. यावरून सिंह यांच्यासह अन्या लोकांनी आपल्याला मारहाण केली. या मारहाणीच्या घटनेनंतर पोलिस मेन्स असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र कुमार यांच्यासह अन्य पदाधिकारी अरगोडा पोलीस ठाण्यात पोहोचले तसेच आरोपींना अटक करण्याची मागणी केली. तसेच हा गुन्हा कोणत्या पक्षाच्या नेत्यांनी केला नसून गुंडांनी केल्याचा आरोप केला. अशा गुंडांना अटक न झाल्यास राज्यभरात पोलीस कर्मचारी निवडणूक कामाच्या सुरक्षेवर बहिष्कार टाकतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.