बंगळुरू : नोटाबंदीला विरोध करणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पुन्हा एकदा लक्ष्य केले. सरकारचा निर्णय लोकविरोधी असल्याचे सांगणारे लोक भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांचे राजकीय पुजारी आहेत. हेच लोक अर्थव्यवस्था, समाजाला खिळखिळे करीत आहेत, अशी टीका त्यांनी केली. सरकारच्या निर्णयाचे समर्थन करणाऱ्या भारतीयांचे त्यांनी आभार मानले. विकासात भारतीयांच्या भूमिकेवर प्रकाश टाकताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, या नागरिकांनी ६९ अब्ज डॉलरची गुंतवणूक करून भारतीय अर्थव्यवस्थेत अमूल्य योगदान दिले आहे. माझ्यासाठी एफडीआयच्या दोन व्याख्या आहेत, असे सांगून मोदी म्हणाले की, एक आहे ‘फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट’ आणि दुसरी ‘फर्स्ट डेव्हलप इंडिया.’ मी पूर्ण विश्वासाने सांगू इच्छितो की, २१वे शतक भारताचे आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोर्तुगालचे पंतप्रधान अॅटोनिओ कोस्टा यांची उपस्थिती होती. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री उपस्थित होते. आम्ही ब्रेन डेडला ब्रेन गेनमध्ये बदलू इच्छितो. विदेशात रोजगार शोधणाऱ्या भारतीय तरुणांसाठी सरकार लवकरच एक कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करणार आहे. ‘प्रवासी कौशल्य विकास योजना’ असे त्याचे नाव आहे. विदेशात आर्थिक संधी शोधणाऱ्यांना सरकार अधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करेल. विदेशातील भारतीयांच्या सुरक्षेला आम्ही सर्वोच्च प्राधान्य देतो, असे सांगून ते म्हणाले की, आम्ही पासपोर्टचा रंग पाहत नाही तर रक्ताचे नाते बघतो. भारतीय प्रवासी संमेलनात सोमवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी प्रवासी भारतीय पुरस्कार वितरित करणार आहेत. (वृत्तसंस्था)
हे तर काळ्या पैशांचे राजकीय पुजारी; पंतप्रधान मोदी यांची टीका
By admin | Published: January 09, 2017 1:47 AM