- प्रमोद गवळी, नवी दिल्ली
देशभरातील सार्वजनिक आरोग्य केंद्रात सर्जन, प्रसुती तज्ज्ञ आणि स्त्री रोग तज्ज्ञ, फिजिशियन्स व बालरोग तज्ज्ञांचा प्रचंड तुटवडा आहे, हे केंद्र सरकारने मान्य केले खरे पण त्यासाठी राज्य सरकारांनाच जबाबदार धरले आहे. सार्वजनिक आरोग्य हा राज्यांचा विषय आहे, असे केंद्राने स्पष्ट केले.केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी देशभरातील सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांचा तुटवडा असल्याची माहिती बुधवारी राज्यसभेत दिली. राज्यसभेतील काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात नड्डा बोलत होते. २०१४-१५ च्या आकडेवारीनुसार, ३१ मार्च २०१५ पर्यंत देशात ८३.४ टक्के सर्जन, ७६.३ टक्के प्रसुती तज्ज्ञ आणि स्त्रीरोग तज्ज्ञ, ८३ टक्के फिजिशियन्स आणि ८२.१ टक्के बाल रोगतज्ज्ञांचा तुटवडा होता, हे नड्डा यांनी कबुल केले.सार्वजनिक आरोग्य हा राज्यांचा विषय आहे. त्यामुळे डॉक्टरांची उपलब्धता सुनिश्चित करणे ही राज्य सरकारांची प्राथमिक जबाबदारी आहे, असे सांगून नड्डा पुढे म्हणाले, राष्ट्रीय आरोग्य मिशन (एनएचएम) अंतर्गत राज्यांना कार्यक्रम अंमलबजावणी योजनांमध्ये त्यांनी सांगितलेल्या आवश्यकतेनुसार नियुक्त्या करणे आणि आरोग्य सुश्रुषा प्रणाली सुदृढ करण्यासाठी मदत केली जाते.