निवडणुकीनंतरच काश्मीरला राज्य दर्जा, ही निवडणूक ऐतिहासिक; अमित शाहांचं आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2024 07:26 AM2024-09-08T07:26:21+5:302024-09-08T07:27:46+5:30
तुम्ही दर्जा कसा देणार ते काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्सने सांगावे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा निशाणा
सुरेश डुग्गर
जम्मू: विधानसभा निवडणूक झाल्यानंतर जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले. जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा तुम्ही कसे देणार, हे काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने सांगावे, असा सवाल त्यांनी केला. जम्मू-काश्मीरमध्ये ३ टप्प्यांत निवडणूक होणार असून भाजपच्या प्रचारासाठी ते त्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत.
जम्मू येथील प्रचारसभेत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सवर कडाडून टीका करताना ते म्हणाले, हे लोक कशा प्रकारचे राजकारण करत आहेत, हे मी समजू शकत नाही. जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा परत मिळवून देणार असा दावा ते करतात. मात्र, ते कसे, हे त्यांनी सांगावे. फक्त पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारच जम्मू-काश्मीरचा दर्जा परत देऊ शकते, असे शाह म्हणाले. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स आघाडी पुन्हा जम्मू-काश्मीरला दहशतवादाच्या आगीत ढकलण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप शाह यांनी केला.
पाकशी चर्चा नाही
शाह म्हणाले की, नॅशनल कॉन्फरन्सने त्यांच्या जाहीरनाम्यात पाकिस्तानशी चर्चेवर जोर दिला आहे. मात्र, मी स्पष्टपणे सांगतो की, जोपर्यंत येथे कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत पाकिस्तानसोबत चर्चा होणार नाही.
यंदाची निवडणूक ऐतिहासिक ठरणार
अमित शाह यांनी सांगितले की, जम्मू- काश्मीरमधील यंदाची निवडणूक ऐतिहासिक आहे. कलम ३७० हटविल्यानंतर भारताच्या राष्ट्रध्वजाखाली आणि राज्यघटनेनुसार होणारी ही पहिली निवडणूक आहे. यापूर्वी दोन ध्वज आणि दोन राज्यघटनांनुसार निवडणूक व्हायची.
काश्मिरी पंडित महिला प्रथमच निवडणूक रिंगणात
काश्मीरमध्ये दहशतवादाला प्रारंभ झाला. त्यानंतर काश्मिरीपंडित महिला पहिल्यांदाच निवडणुकांच्या रिंगणात उतरली आहे. पुलवामातील त्रिचल गावातील माजी सरपंच डेजी रैना या १८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकांतील पहिल्या टप्यात लढत देणाऱ्या नऊ महिला उमेदवारांपैकी एक आहेत.
डेजी रैना यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे (आठवले गट) उमेदवारी मिळाली आहे. एनडीएचा हा घटक पक्ष आहे. रैना यांनी पत्रकारांना सांगितले की, स्थानिक नागरिक, युवकांनी केलेल्या आग्रहामुळे मी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी सरपंच म्हणून गेल्या पाच वर्षांत जे काम केले त्यामुळे स्थानिक नागरिकांनी त्यांना विधानसभा निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला.
डेजी यांनी सांगितले की, १९९०च्या दशकातील जम्मू-काश्मीरमधील वातावरण व आताची स्थिती यात खूप मोठा फरक आहे. सरपंच म्हणून काम करताना अनेक आव्हानांचा सामना केला. आता विधानसभा निवडणुकीमधील आव्हाने पेलण्यासाठी मी सज्ज झाले आहे.