गुवाहाटी/नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कथित बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते पवन खेडा यांना आसाम पोलिसांनी गुरुवारी दिल्ली विमानतळावर अटक केली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांची अंतरिम जामिनावर सुटका केली. काँग्रेसच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख खेडा पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सहभागी होण्यासाठी रायपूरला जात असताना पोलिसांनी त्यांना विमानातून उतरविले व नंतर अटक केली. यानंतर खेडा यांनी अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
न्यायालयाने त्यांची २८ फेब्रुवारीपर्यंत अंतरिम जामिनावर सुटका केली. खेडा विमानातून खाली उतरल्यानंतर पक्षाचे अनेक नेतेही खाली उतरले. सर्वांनी तिथेच धरणे धरले. खेडांसोबतच काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, सरचिटणीस रणदीप सुरजेवाला, तारिक अन्वर, अविनाश पांडे, प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत आणि अनेक नेते धरणावर बसले. खेडा यांच्या याचिकेवर उत्तर देण्यास न्यायालयाने आसाम आणि उत्तर प्रदेश राज्यांना नोटीस बजावली आहे.
प्रवाशांसाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्थाखेडा यांच्या अटकेबद्दलच्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर, इंडिगोने गुरुवारी सांगितले की, प्रवाशांना पोलिसांनी उतरवले आणि आम्ही त्यांच्या सल्ल्याचे पालन करत आहोत. नंतर सर्वच प्रवाशांना उतरवून इंडिगोच्या दुसऱ्या विमानाने रायपूरला दुपारी अडीच वाजता नेण्यात आले.