Kangana Ranaut ( Marathi News ) : भाजपा खासदार कंगना राणौतने काल रद्द केलेले तीन कृषी कायदे पुन्हा आणावेत, असं विधान केले होते. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. यावरुन काँग्रेसने भाजपावर जोरदार निशाणा साधला होता. दरम्यान, आता कंगना राणौतने या विधानावरुन यू-टर्न घेतला आहे.
मंडी लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच खासदार झालेल्या कंगना राणौत यांनी बुधवारी व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी कंगना राणौत म्हणाल्या, 'गेल्या काही दिवसांत मीडियाने मला कृषी कायद्यांवर प्रश्न विचारले आणि मी सुचवले की शेतकऱ्यांनी पंतप्रधानांना हे कायदे परत आणण्याची विनंती करावी. माझ्या या वक्तव्यामुळे अनेकांची निराशा झाली आहे.
रद्द करण्यात आलेले तीन कृषी कायदे परत आणावेत; कंगना राणौतची मोठी मागणी
खासदार कंगना राणौतने काल केलेल्या विधानानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. भाजपा नेत्यांनी या वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
कंगना राणौत म्हणाल्या, 'जेव्हा कृषीविषयक कायदे आणले, तेव्हा आपल्यापैकी अनेकांनी त्याचे समर्थन केले. पण संवेदनशीलता आणि सहानुभूतीमुळे पंतप्रधानांनी कायदे मागे घेतले. त्यांच्या शब्दाची प्रतिष्ठा राखणे हे आपल्या सर्व कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. मी आता कलाकार नसून भाजपची कार्यकर्ता आहे, हेही लक्षात ठेवावे लागेल. माझे विचार माझे नसावेत, पक्षाची भूमिका असली पाहिजे, असंही कंगना राणौत म्हणाली. 'जर माझ्या बोलण्याने आणि विचाराने कोणाची निराशा झाली असेल तर मला खेद आहे,मी आपले शब्द मागे घेते, असंही कंगना राणौत म्हणाल्या.
कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केलं होतं विधान
खासदार कंगना राणौत माध्यमांसोबत बोलताना म्हणाल्या, 'शेतकऱ्यांबाबतचे जे कायदे मागे घेतले आहेत, ते पुन्हा लादले जावेत, असे मला वाटते. हे वादग्रस्त असू शकते, पण मला वाटते की शेतकऱ्यांसाठी फायदेशीर कायदे परत आले पाहिजेत आणि शेतकऱ्यांनी स्वतःच त्याची मागणी केली पाहिजे. जेणेकरून इतर ठिकाणांप्रमाणे आमचे शेतकरी समृद्ध होत असून, शेतकऱ्यांच्या समृद्धीला कुठेही खंड पडू नये. शेतकरी हा देशाच्या विकासातील प्रमुख शक्तीचा आधारस्तंभ आहे. काही राज्यांमध्ये ज्या तीन कायद्यांवर आक्षेप घेण्यात आला होता, त्यांनी सर्व शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन ते कायदे स्विकारावेत, अशी विनंती मी त्यांना करू इच्छितो, असंही राणौत म्हणाल्या.