नवी दिल्ली- पाकिस्तानने ताब्यात ठेवलेल्या कुलभूषण जाधव यांच्या स्थितीबाबत आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीबाबत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये वक्तव्य करण्याची शक्यता आहे. राज्यसभेत सकाळी ११ वाजता व लोकसभेत दुपारी १२ वाजता सदस्यांना सर्व परिस्थितीबाबत माहिती देतील.
कुलभूषण जाधव यांना हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली २०१६ साली मार्च महिन्यात पाकिस्तानने अटक केली होती. त्यानंतर तेथील लष्करी न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली होती. तीन दिवसांपुर्वी कुलभूषण जाधव यांची आई व पत्नी यांनी पाकिस्तानात जाऊन त्यांची भेट घेतली. मात्र या भेटीवेळेस या दोघींवर अनेक बंधने घालण्यात आली होती. बांगड्या, मंगळसूत्र आणि पादत्राणेही काढून तेही काचेच्या पलिकडे बसून भेटण्याची परवानगी देण्यात आली. तसेच मराठीतून बोलण्यासही मनाई करण्यात आली होती. कुलभूषण यांच्या आईला तेथील माध्यमांनी अपमानास्पद प्रश्नही विचारले होते.
पाकिस्तानच्या या सर्व संतापजनक कृत्यावर भारतात जनमत संतप्त झाले आहे. त्याचे प्रतिबिंब संसदेतही उमटले. विविध पक्षाच्या खासदारांनी बुधवारी पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घ्या अशी सरकारकडे भूमिका मांडली. त्यामुळे यापुढे भारत सरकार कोणती भूमिका घेईल व कुलभूषण यांच्या भवितव्याच्या दृष्टीने परराष्ट्रमंत्री स्वराज यांचे आजचे वक्तव्य महत्त्वाचे असेल.