पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर २०२१ व मे २०२२ मध्ये इंधनावरील उत्पादनशुल्कात कपात केल्यामुळे पेट्रोलच्या किमती अनुक्रमे १३ व १६ रूपयांनी कमी झाल्या. त्याचवेळी राज्य सरकारांनी व्हॅटमध्ये कपात करून जनतेला दिलासा देण्याचे आवाहन करण्यात आले होते. तथापि, बिगर भाजपशासित राज्यांनी केवळ राजकारणासाठी त्या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही. परिणामी, भाजपशासित व बिगर भाजपशासित राज्यांमध्ये पेट्रोलच्या दरात १५ रूपयांची तफावत आहे. ती दूर करण्यासाठी विरोधी पक्षांच्या राज्य सरकारांनी आतातरी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी ‘लाेकमत नॅशनल काॅन्क्लेव्ह’मध्ये बाेलताना केले.
केंद्रात गृहनिर्माण व शहरी विकास खातेही सांभाळणारे हरदीपसिंह पुरी परिषदेच्या सातव्या सत्रात बोलत होते. सीएनएन न्यूज-१८ च्या शिवानी गुप्ता यांनी त्यांच्याशी संवाद साधला. पुरी म्हणाले की, इंधनाचे दर आवाक्यात राहावेत यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. तथापि, राज्यांनी व्हॅट कमी केल्यास जनतेला अधिक दिलासा मिळेल. रशियाकडून तेल खरेदी करण्यावरून स्पष्ट झाले, की माेदी सरकार काेणत्याही देशांच्या दबावात काम करीत नाही. पूर्वी आपण रशियाकडून अत्यल्प तेल खरेदी करीत हाेताे. कारण, जवळच्या अरब देशांमधून स्वस्तात तेल मिळत हाेते. आता रशियाकडून स्वस्त तेल मिळत असल्याने ती खरेदी वाढविली आहे. भारत ही मोठी बाजारपेठ असल्याने एक प्रकारे आपण मार्केट कार्ड खेळत आहोत. त्यामुळे पाश्चिमात्य देशांनी नाराज हाेण्याचे कारण नाही.
लाेकशाही धाेक्यात आल्याच्या काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आरोपाला उत्तर देताना पुरी यांनी गांधींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. उलट, काॅंग्रेसने लाेकशाहीला अनेकदा नख लावले आहे. खरेतर परदेशात जाऊन देशाची बदनामी करणाऱ्या राहुल गांधींना त्यांचा पक्षच बाहेर काढील. कारण, त्यांच्याच पक्षाला ते डाेईजड झाले आहेत, अशी टीका पुरी यांनी केली. काॅंग्रेस अशीच कुरघाेड्या करीत राहिली तर २०२४ मध्ये आम्ही त्यांच्यापेक्षा अधिक जागा जिंकू, असा दावा त्यांनी केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"