Mashid Survey : संभलच्या जामा मशीद आणि अजमेरच्य ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्यानंतर आता आग्राच्या जामा मशिदीच्या सर्वेक्षणाचे प्रकरण चर्चेत आले आहे. आग्राच्या जामा मशिदीखाली भगवान कृष्णाची मूर्ती असल्याचा दावा केला जातोय. ग्राउंड पेनेट्रेटिंग रडार (जीपीआर) वापरुन जामा मशिदीच्या पायऱ्यांचे सर्वेक्षण करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली असून, 23 डिसेंबरला सुनावणी होणार आहे.
काय दावा करण्यात आला आग्रा कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत योगेश्वर श्री कृष्ण जन्मस्थान सेवा संघ ट्रस्ट आणि श्री कृष्ण जन्मभूमी संरक्षित सेवा ट्रस्टने म्हटले की, श्रीकृष्णाच्या मूर्ती आग्राच्या जामा मशिदीच्या पायऱ्यांखाली पुरल्या आहेत. सुप्रसिद्ध कथाकार देवकीनंदन ठाकूर यांच्याशी संबंधित या दोन ट्रस्टच्या याचिकेवर 23 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. जामा मशिदीच्या पायऱ्यांखाली गाडलेल्या मूर्ती बाहेर काढून ताब्यात द्याव्यात, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे. सन 1670 मध्ये औरंगजेबाने केशवदेव मंदिर पाडून त्यात ठेवलेल्या मूर्ती आग्राच्या जामा मशिदीत पुरल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
या आधारावर याचिका दाखल केलीफिर्यादीच्या वतीने वकील अजय प्रताप सिंग यांनी आपल्या याचिकेत एका पुस्तकाचा हवाला दिला आहे. त्यात त्यांनी म्हटले की, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) चे पहिले महासंचालक अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी एक पुस्तक लिहिले आहे. 'अ टूर इन ईस्टर्न राजपुताना 1882-83' या पुस्तकात अलेक्झांडर यांनी औरंगजेबाने भगवान कृष्णाच्या मूर्ती जामा मशिदीच्या पायऱ्यांखाली पुरल्याचा दावा केला आहे
ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार म्हणजे काय?ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार (GPR) ही एक भूभौतिकीय लोकेटिंग पद्धत आहे, ज्यामध्ये रेडिओ लहरींचा वापर जमिनीच्या पृष्ठभागाखालील प्रतिमा कॅप्चर करण्यासाठी केला जातो. त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, याद्वारे जमिनीखालील कोणतीही वस्तू जमिनीला कोणतीही हानी न होता दाखवता येते. ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम वापरुन फोटो दाखवते. यामध्ये 10 MHz ते 2.6 GHz मधील मायक्रोवेव्ह वापरल्या जातात. हे सिग्नल जमिनीतून प्रसारित केले जातात अन् अँटेना या सिग्नल्सच्या रिटर्नमधील चढउतार कॅप्चर करतो. याद्वारे जमिनीतील प्रतिमा तयार केल्या जातात.