बंगळुरू – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता किती आहे हे कुणाला सांगण्याची गरज नाही. नरेंद्र मोदींचे चाहते कधी त्यांचा पुतळा बनवतात तर कुठे मंदिर उभारून त्यांची पूजा करतात. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी हे केवळ गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जात होते. परंतु लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या प्रचार कॅम्पेनमुळे देशभरात मोदी लाट उदयास आली. नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांचा चेहरा पंतप्रधानपदासाठी पुढे करण्यात आला त्यानंतर देशात सत्तापालट झाल्याचं पाहायला मिळालं.
काही दिवसांपूर्वी पुण्यात नरेंद्र मोदींचे मंदिर उभारल्याचं ऐकलं असेल आता बंगळुरूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुर्णाकृती पुतळा शहरात लवकरच उभारण्यात येणार आहे. या पुतळ्याचं वैशिष्टे म्हणजे संपूर्णपणे टाकाऊ साहित्य वापरुन हा पुतळा बनवण्यात आला आहे. गुंटूर जिल्ह्यातील तेनाली येथील कलाकार कतुरू व्यंकटेश्वर राव आणि त्यांचा मुलगा कतुरू रवी यांनी हा पुतळा बनवला आहे. दोन महिन्यापूर्वी बाप-लेकाने मिळून १४ फूट उंच पुतळा निर्माण करण्यात सुरुवात केली होती. आता हा पुतळा तयार झाला असून लवकरच शहरात उभारला जाईल.
नरेंद्र मोदींच्या या पुतळ्याबाबत व्यंकटेश्वर राव म्हणाले की, ऑटोमोबाईल कंपन्यांनी फेकून दिलेल्या टाकाऊ साहित्यातून या पुतळ्याची उभारणी केली. या पुतळ्याचं वजन एक टनाहून जास्त आहे. नट आणि बोल्टच्या सहाय्याने सुरुवातीला पुतळा तयार करण्याचं काम सुरू झालं. त्यानंतर मेटल चेन, कॉग्स, व्हिल्स, रॉड्स, शीट्स आणि इतर तुटलेले निरुपयोगी धातुचे तुकडे या शिल्पात वापरण्यात आले. मोदींच्या पुतळ्यासाठी आम्ही जीआय वायरीचा चांगल्यारितीने वापर केला. मोदींचा चष्मा, केशरचना, दाढीला जीआय वायरसारख्या साहित्याची गरज होती असं त्यांनी सांगितले.
तसेच हा पुतळा तयार करण्यासाठी १० जणांची वेल्डिंग आणि इतर कामात मदत झाली. ६०० तासांपेक्षा जास्त वेळ पंतप्रधानांचा पुतळा बनवण्यासाठी लागला. सहसा असा पुतळा तयार करण्यासाठी स्क्रॅप आर्टचा वापर केला जात नाही. उपलब्ध साहित्यात चेहरा बनवणं कठीण असतं. आम्ही हा प्रयत्न पहिल्यांदा महात्मा गांधी यांचा पुतळा तयार करुन केला. त्यात ७५ हजार नट आणि बोल्टचा वापर केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा आमचा दुसरा पुतळा आहे. ज्यात २ टन भंगार, गियर व्हील, वॉशर, बोल्ट, नट यांचा समावेश आहे असं कतुरु रवी यांनी सांगितले. भाजपा नगरसेवक मोहन राजू यांनी हा पुतळा उभारण्यासाठी आर्थिक मदत केली. दरम्यान, हैदराबाद, विशाखापट्टणम, गुंटूर आणि चेन्नई येथील स्क्रॅप विक्रेत्यांना भेट देऊन साहित्य जमा केले. आम्ही मुख्यत: गुंटूर येथील दुकानांवर अवलंबून होतो कारण इथं सर्व प्रकारचे भंगार उपलब्ध होते. आवश्यक साहित्य शोधण्यासाठी आम्ही अनेक दुकानांच्या फेऱ्या मारल्या असं व्यंकटेश्वर राव यांनी सांगितले.