भुवनेश्वर - जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून सरदार वल्लभाई पटेल यांच्या नर्मदा जिल्ह्यातील 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ची नोंद झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 31 ऑक्टोबर रोजी सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर, देशात सर्वत्र या पुतळ्याचीच चर्चा सुरू आहे. मात्र, दुसरीकडे सरदार पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या सर्वात लहान पुतळ्याचीही चर्चा आहे. विशेष म्हणजे सरदार पटेलांचा सर्वात लहान पुतळ्याचेही आजच लोकार्पण झाले आहे.
ओडिशाच्या भुवनेश्वर येथील एका मूर्ती कलाकाराने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वात लहान पुतळ्याची निर्मित्ती केली आहे. विशेष म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटीचे हे जगातील सर्वात लहान व्हर्जन ठरले. मूर्ती कलाकार एल. ईश्वर राव यांनी एका बंद बाटलीत सरदार पटेल यांचा हा पुतळा बसवला आहे. या पुतळ्याची उंची 3.5 इंच एवढी असून तो बनविण्यासाठी साबणाचा वापर करण्यात आला आहे. राष्ट्रीय एकता दिवसाचे निमित्त साधत मी सरदार पटेल यांना आदरांजली वाहण्यासाठी हा पुतळा बनविल्याचे ईश्वर राव यांनी म्हटले. दरम्यान, गेल्या 20 वर्षांपासून मिनिएटर आर्ट शिकणाऱ्या राव यांना हा पुतळा बनविण्यासाठी 3 दिवस लागले.
दरम्यान, सरदार वल्लभभाई पटेल यांचा गुजरातमधील 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' हा जगातील सर्वात उंच म्हणजेच 182 मीटर उंचीचा पुतळा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ऑक्टोबर 2013 मध्ये पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम झाला होता. पुढील चार वर्षांत लॉर्सन अॅन्ड टुब्रो या कंपनीला काम करण्यास देण्यात आले. या पुतळ्यासाठी 2,989 कोटींचा खर्च आला आहे. लॉर्सन अॅन्ड टुब्रो आणि राज्य सरकार संचलित सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेडवर पुतळा उभारणीची जबाबदारी होती.