नवी दिल्लीः काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलची प्रमुख दिव्या स्पंदना अर्थात अभिनेत्री रम्या पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या टीकेचं लक्ष्य ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवर आक्षेपार्ह टिप्पणी करून तिनं वाद ओढवून घेतला आहे.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं - 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चं लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पुतळ्याची पाहणी केली. त्यावेळी या पुतळ्याच्या पायाशी ते उभे असल्याचा फोटो व्हायरल झाला होता. स्वाभाविकच, भव्य पुतळ्यापुढे मोदी खूपच छोटे - ठिपक्यासारखे दिसत आहेत. या फोटोला रम्यानं दिलेल्या 'कॅप्शन'वरून नेटकरी खवळलेत. Is that bird dropping?, हा तिचा प्रश्न अनेकांना खटकला आहे. प्रतिष्ठेच्या पदावर विराजमान असलेल्या व्यक्तीबद्दल अशी भाषा अशोभनीय असल्याची टीका नेटकरी करत आहेत.
गेल्याच महिन्यात, मोदींचा उल्लेख 'चोर' असा केल्यानं रम्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंच - म्हणजेच जगातील सर्वात उंच पुतळा साकारून पंतप्रधान मोदींनी, भाजपाने काँग्रेसवर कुरघोडी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते सरदार पटेल यांचं 'काँग्रेसत्व' ठसवण्याचा आणि मोदींच्या मनसुबे उधळण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.