नवी दिल्ली - स्टॅच्यू ऑप युनिटी या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे आज लोकार्पण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते जगातील या सर्वांत उंच आणि भव्य-दिव्य पुतळ्याचे लोकार्पण झाले. या सोहळ्याला भाजापाध्यक्ष अमित शहा यांसह भाजपाचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. मात्र, भाजपाचे लोहपुरुष लालकृष्ण अडवाणी यांची या कार्यक्रमाला गैरहजेरी होती. त्यामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
31 ऑक्टोबर हा दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती तर आयर्न लेडी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आहे. त्यामुळे, राजधानी दिल्लीत आज या दोन्ही महान नेत्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह, सोनिया गांधी आणि काँग्रसच्या ज्येष्ठ नेत्यांनी इंदिरा गांधींच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांनाही जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली. दुसरीकडे सरदार पटेल यांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे आज मोदींच्या हस्ते लोकार्पण झाले. मात्र, भाजपाचे ज्येष्ठ नेते या सोहळ्याला हजर नव्हते. भाजपाचे लोहपुरुष समजले जाणाऱ्या लालकृष्ण अडवाणी यांनी दिल्लीतील सरदार पटेल यांच्या पुतळ्याजवळ जाऊन त्यांना आदरांजली अर्पण केली. तसेच इंदिरा गांधींनाही अडवाणींनी श्रद्धांजली वाहिली. त्यामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते असूनही अडवाणी मोदींच्या या भव्य-दिव्य सोहळ्याला का हजेरी लावली नाही, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.