नवी दिल्ली : ‘स्टॅच्यू आॅफ युनिटी’ येत्या दोन वर्षांत पूर्ण होणार असल्याचा विश्वास ९१ वर्षीय पद्मश्री पुरस्कारविजेते राम व्ही. सुतार यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून साकारला जाणारा सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वांत उंच पुतळा गुजरातमध्ये उभारला जाणार असून, २०१४मध्ये सरकारने हे काम सुतार यांच्याकडे सोपविले आहे. सुतार यांनी साकारलेले महात्मा गांधींचे पुतळे फ्रान्स, इटली, अर्जेंटिना, बाबार्डोस, रशिया आणि इंग्लंड या देशांना भेट देण्यात आले आहेत. संसद भवनातील १७ फूट उंच महात्मा गांधींचा ध्यानमुद्रेतील लक्ष वेधून घेणारा पुतळाही सुतार यांनी बनविला आहे. मध्य प्रदेशातील गांधीसागर धरणात ४५ फूट उंच चंबळचे स्मारक उभारल्यानंतर सुतार प्रसिद्धिझोतात आले होते.देश विघटनाच्या वाटेवर असताना सरदार पटेल यांनी तो एकसंघ ठेवण्याचे काम केले. त्यामुळेच एकात्मतेचे प्रतीक ठरणारा हा पुतळा उभारणे हे माझे ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. - राम व्ही. सुतार, पद्मश्री पुरस्कारविजेते मेक इन इंडिया... हा पुतळा आकाराने भव्य असल्यामुळे त्याचे काही भाग चीनमधून आणले जात असल्याच्या वृत्ताचा सुतार यांनी इन्कार केला. या प्रकल्पावर मी अगदी बारकाईने निगराणी ठेवत असून, तो पूर्णपणे ‘मेक इन इंडिया’चा भाग असेल, असे ते म्हणाले.
‘स्टॅच्यू आॅफ युनिटी’ दोन वर्षांत पूर्ण होणार
By admin | Published: May 13, 2016 4:14 AM