ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - तुम्ही रिलायन्स जिओचे कार्ड वापरता?... तुमच्या मोबाइलवर रिलायन्स जिओतर्फे प्रत्येक दिवशी डाऊनलोडची मर्यादा वाढवण्यासंदर्भात मेसेज येत आहे?.... तर मग वेळीच सावधान व्हा !... या मेसेजमधील आमिषाला बळी पडू नका. कारण या मेसेजमधील माहिती बोगस असून याद्वारे तुमची खासगी माहिती चोरी होण्याचा धोका आहे.
रिलायन्स जिओ युजर्ससाठी सोशल मीडियावर डाऊनलोड मर्यादा वाढीवसंदर्भातील एक मेसेज सध्या भलातच व्हायरल झाला आहे. पण अशा कोणत्याही मोहाला अजिबात बळी पडू नका. या मेसेजमधील लिंकवर क्लिक केल्यास युजर्सचा प्रत्येक दिवसाचा डेटा 1 जीबीहून वाढवून त्याची मर्यादा 10 जीबी होईल, अशा आशयाचा मेसेज दिसेल. हा मेसेज काही दिवसांपासून फेसबुक आणि व्हॉट्सअॅप ग्रुपवर मोठ्या प्रमाणात फिरत आहे.
या लिंकवर क्लिक केल्यानंतर फोन नंबर, ईमेल आयडी आणि अन्य खासगी माहिती http://upgrade-jio4g.ml/ साइटवर भरावी लागते. युजर्सने माहिती भरल्यानंतर, डेटा लिमिटचा मेसेज तुमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरही शेअर करा किंवा 10 ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, असा संदेश येतो.
मात्र ही साइटच http://upgrade-jio4g.ml/ बोगस असून लोकांची फसवणूक करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. कारण रिलायन्स जिओची ही अधिकृत साइट नाही. शिवाय साइटवरील अटी व शर्तींमध्ये या साइटचा जिओशी काहीही संबंध नाही, असे नमूद करण्यात आले आहे.
इंटरनेट डेटाची मर्यादा वाढेल अशा मोहामुळे या धोकादायक साइटवर तुम्ही स्वतःची खासगी माहिती देत आहातच, याव्यतिरिक्त व्हॉट्सअॅवर हा मेसेज शेअर करुन मित्र-मैत्रिणींनाही अडचणीत टाकत आहात. त्यामुळे वाढीव डेटा लिमिटच्या लालसेपोटी कुठल्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका.
दरम्यान, नवीन वर्षाचे गिफ्ट म्हणूनरिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी 4जी डेटा आणि मोफत कॉलची सुविधा उपलब्ध मार्च 2017पर्यंत वाढवली होती. त्यानंतर कोणतीही ऑफर जिओकडून अधिकृतरित्या देण्यात आलेली नाही.