ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 28 - भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी लखनऊच्या इंदिरा गांधी प्रतिष्ठानमध्ये पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. लोक कल्याण संकल्प पत्र असे त्यांनी जाहीरनाम्याला नाव दिले. उत्तरप्रदेशचा विकास केंद्रस्थानी ठेऊन भाजपाने हा जाहीरनामा तयार केला आहे.
अयोध्येतील ज्या राम मंदिराच्या मुद्यावर भाजपाने केंद्रातील सत्ता मिळवली. त्या राम मंदिरालाही भाजपाने जाहीरनाम्यात स्थान दिले आहे. संविधानाच्या चौकटीत राहून राम मंदिर उभारणीचा प्रयत्न करु असे शहा यांनी सांगितले. भाजपा दोन तृतीयांश बहुमत मिळवून उत्तरप्रदेशात सत्तेवर येईल असा दावा त्यांनी केला.
मिस कॉलवरुन आम्ही 30 लाख लोकांचा प्रतिसाद जाणून घेतला आहे. 5 हजार जाहीर सभा केल्या आहेत असे त्यांनी सांगितले. दोनवर्षांनी 2019 मध्ये होणारी लोकसभेची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाला उत्तरप्रदेश जिंकणे अत्यंत महत्वाचे आहे. उत्तरप्रदेश आजही बिमारु राज्य आहे.
मध्यप्रदेश, राजस्थान ही दोन राज्ये भाजपाच्या राजवटीत प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. नरेंद्र मोदींच्या झंझावताच्या बळावर 15 वर्षांनी उत्तरप्रदेशची सत्ता मिळवण्याचे भाजपाचे स्वप्न आहे. 403 सदस्यांच्या उत्तरप्रदेश विधानसभेत भाजपाचे सध्या फक्त 47 आमदार आहेत.