येत्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात विरोधकांची मोठी आघाडी उघडण्याची तयारी बिहारमधून सुरु आहे. यामुळेच काल मुंबईत बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार आणि तेजस्वी यादव आले होते. याच बिहारमध्ये मोदी मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत. सत्तेबाहेर राहुनही भाजपाला मदत करणाऱ्या मोदींच्या हनुमानाला लवकरच मोठे गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे.
भाजपाने लोकसभेची रणनीती आखण्याची तयारी केली आहे. रामविलास पासवान यांच्या लोजपामध्ये दोन भाग पडले आणि लोजपा व लोजपा आर असे दोन पक्ष निर्माण झाले. यापैकी चिराग पासवान यांच्याकडे असलेल्या पक्षाने नेहमीच मोदींची सत्तेबाहेर राहुन साथ दिली आहे. लोजपा आरचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि जमुईचे खासदार चिराग पासवान मोदींच्या मंत्रिमंडळात जाण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
बिहार निधानसभेत पासवान यांचा पक्ष भाजपाच्या एनडीएपासून वेगळा होऊन लढला होता. ही भाजपाचीच रणनिती होती असे मानले जात आहे. यामुळे नितिश कुमार यांच्या जदयूला मोठे नुकसान झाले होते. जदयूला गेल्या वेळी ११५ जिंकलेल्यापैकी ४३ जागाच जिंकता आल्या होत्या. जदयूसोबत युती असली तरी पासवान यांच्या फौजेत भाजपाने आपलेच बलाढ्य नेते उतरविले होते. यामुळे जदयूला फटका बसला होता.
याचबरोबर नितिश कुमार यांना विरोधी चेहरा म्हणून देखील पासवान समोर येत आहेत. बिहारमधील पोटनिवडणुकीत पासवान यांनी ऐनवेळी भाजपाच्या उमेदवाराचा प्रचार केला होता. एका जागेवर जिथे भाजपाला केवळ २ ते ३ हजार मतेच मिळायची तिथे ६५ हजार मते मिळाली होती. तसेच दोन जागांवर भाजपाचे उमेदवार जिंकले होते.
दुसरीकडे चिराग यांचे काका व मंत्री पशुपति पारस यांच्या अडचणी वाढत आहेत. त्यांचे खासदार चंदन सिंग, वीणा सिंग आणि मेहबूब अली कैसर यांची चिराग पासवान यांच्याशी जवळीक वाढवत आहेत. रामविलास यांचा पक्ष जरी पारस यांच्याकडे असला तरी मते मात्र चिराग यांच्याकडे आहेत. यामुळे भाजपा पारस यांना बाहेरचा रस्ता दाखवून चिराग यांना कॅबिनेटमध्ये घेण्याची शक्यता आहे.