नवी दिल्ली - आज देशात असेल वा वृत्तपत्रात दिसतं की मोदी है तो मुमकिन है मात्र हे खरं आहे. मोदी आहेत म्हणून १०० रुपये किलो कांदा आहे, ४५ वर्षातील सर्वाधिक जास्त बेरोजगारी आहे. ४ कोटी युवक बेरोजगार आहे, १५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असा टोला काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी नरेंद्र मोदींना लगावला आहे. काँग्रेसकडून रामलीला मैदानावर भारत बचाव रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यात प्रियंका गांधी यांनी भाषण केले.
यावेळी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, आपला देश विविध जाती-धर्माचा आहे, देशात आज जे वातावरण आहे त्याच्याविरोधात आपण आवाज उचलला नाही तर भविष्यात संविधान नष्ट केलं जाईल. धर्माच्या नावावर देशाचं विभाजन केले जाईल. आपल्याला या ताकदीपासून देशाला वाचवायचं आहे. या देशात प्रेम, अहिंसा, बंधुप्रेम आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच उन्नाव येथे झालेल्या पीडितेला जाळण्याचं काम केलं गेले. देशातील मुली सुरक्षित नाही, प्रत्येक माणसाला न्यायासाठी झगडावं लागतं. आपल्याला न्यायाची लढाई लढायची आहे. भाजपापासून देशाला वाचविण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल. नागरिकत्व सुधारणा विधेयक हे देशासाठी धोकादायक आहे. धर्माच्या नावावर देशाचं विभाजन केलं जात आहे. जे लोक आज आवाज उचलणार नाहीत त्यांना इतिहासात काही स्थान नसेल असं आवाहन प्रियंका गांधी यांनी कार्यकर्त्यांना केलं.
महिला अत्याचार, शेतकरी आत्महत्या, आर्थिक मंदी अशाविविध मुद्द्यावरुन प्रियंका गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारला लक्ष्य केलं. यावेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. मोदींनी जनतेला वचन दिले की २०२४ पर्यंत ते देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सवर आणतील. आता हे सिद्ध झाले की ही आश्वासने खोटी होती आणि त्यांनी देशातील जनतेची दिशाभूल करण्यासाठी जे आश्वासने दिली होती ती ती पूर्ण करण्यात अपयशी ठरले अस आरोप त्यांनी केला.