ऑनलाइन लोकमत
वाराणसी, दि. 10 - ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉने आपल्या मित्राची अंतिम इच्छा पुर्ण करण्यासाठी गंगेत त्याच्या अस्थी विसर्जित केल्या. अस्थी विसर्जन करण्यासाठी स्टीव्ह वॉ मंगळवारी बनारसमध्ये पोहोचले होते. स्टीव्ह वॉ आल्याने एखाद्या क्रिकेट कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले असावेत असंच सर्वाना वाटलं होतं. पण स्टीव्ह वॉ यांच्या येण्यामागचं कारण होतं, आपला जवळचा मित्र स्टीफन याच्या अस्थी गंगेत विसर्जित करणं.
आपल्या मृत्यूनंतर अस्थी गंगेत विसर्जित करण्यात याव्यात अशी अंतिम इच्छा स्टीफनने स्टीव्ह वॉ यांच्याकडे व्यक्त केली होती. स्टीफन इस्कॉन मंदिराशी संबंधित होता. आपल्या मृत्यूनंतर हिंदू परंपरेप्रमाणे आपल्यावर अंत्यसंस्कार करण्यात यावेत असंही स्टीफनने सांगितलं होतं. इतकंच नाही तर आपल्याला अग्नी दिल्यानंतर अस्थी गंगेत विसर्जन करण्याची इच्छाही व्यक्त केली होती.
चार महिन्यापुर्वीच स्टीफनचं निधन झालं. सिडनीमध्येच हिंदू परंपरेप्रमाणे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या मित्राने व्यक्त केलेल्या इच्छेप्रमाणे स्टीव्ह वॉ गंगेत अस्थी विसर्जन करण्यासाठी दशाश्वमेध घाटावर पोहोचले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मित्र जॉन्सनदेखील होता. बोटीतच पूजा केल्यानंतर अस्थी विसर्जन करण्यात आलं.
आपल्या जिगरी मित्राप्रमाणे स्टीव्ह वॉ यांचंही भारताशी जवळचं नातं आहे. भारतात अनेक सामाजिक कामांमध्ये त्यांचा सहभाग आहे. स्टीव्ह वॉ कोलकातामध्ये कृष्ठरोग पीडित मुलांच्या भविष्यासाठी निधी गोळा करण्यात मदत करतात. येथील जवळजवळ 300 मुलांसाठी स्टीव्ह वॉ म्हणजे 'फादर टेरेसा' आहेत.
2009 मध्ये स्टीव्ह वॉ यांनी या संस्थेची सुरुवात केली. स्टीव्ह वॉ यांनी एकदा सांगितलं होतं की 'मी कोलकात्यात जेव्हा मदर टेरेसा यांची भेट घेतली होती तेव्हाच चांगलं काम करण्याची प्रेरणा मला मिळाली होती'.