बिहारमधील गया येथील बोधगया येथे मोठ्या संख्येने बौद्ध भिक्षू राहतात. ते इथे राहून पूजापाठ करण्याबरोबरच अध्ययनही करतात. तर, गया येथे परदेशी बौद्ध भिक्षू यावेळी भाताची शेती करतानाही दिसत आहेत. यावेळी लाओस येथून मागवण्यात आलेले स्टिकी राईसची रोपं शेतात लावण्यात आली आहेत. थायलंड, लाओस, कंबोडियासह विविध देशांमधील बौद्ध भिक्षू हे स्वत: शेतात भाताची लावणी करताना दिसून आले. या तांदळाचा वापर हा विशेष पूजा आणि खास प्रसंगी केला जातो.
स्टिकी राइस हा चिकट तांदूळ म्हणूनही ओळखला जातो. हा तांदूळ बोधगया येथील हॉटेलमध्ये खाण्यासाठी मिळत नाही. त्यासाठी थायलंड येथून स्टिकी राईस मागवला जातो. मात्र थायलंड येथून बोधगया येथे आणेपर्यंत त्याची किंमत खूप वाढते. त्यामुळे बौद्ध भिक्षू वट लाओस मंदिराजवळ जमीन भाड्याने घेऊन भात शेती करत आहेत. लाओस किंवा थायलंडमध्ये या तांदळाची किंमत ही ७० ते ८० रुपये प्रतिकिलो आहे. मात्र बोधगया येथे तो ५०० ते ६०० रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे.
वट लाओस मंदिराचे केअरटेकर संजय कुमार यांनी सांगितलं की, परदेशातून आलेल्या बौद्ध भिक्षूंनी काही जमीन घेऊन त्यावर भाताची लावणी केली आहे. यामध्ये थायलंड, लाओस, कंबोडिया येथील बौद्ध भिक्षूंचा समावेश आहे. ही शेती रामपूर गावात भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनीमध्ये केली जात आहे. हा तांदूळ खूप चिकट होतो. त्यामुळे तो बांबूच्या भांड्यामध्ये ठेवून वाफेवर शिजवला जातो. तसं पाहायला गेल्यास येथे गेल्या चार वर्षांपासून तांदळाची शेती होत आहे. मात्र गेल्या वर्षी पाऊस न पडल्याने त्याचं उत्पादन पुरेसं झालेलं नाही. मात्र काही वर्षांपूर्वी याची चांगली शेती झाली होती.
तर स्टिकी राइसबाबत माहिती देताना वट लाओस बौद्ध मंदिरातील भिक्षू सायसाना बौथवौंग सांगतात की, लीजवर जमीन घेऊन आम्ही एक बीघा जमिनीमध्ये स्टिकी राइसची शेती केली आहे. विविध देशातून आलेले बौद्ध भिक्षू पूजापाठ आणि शिक्षणाशिवाय शेती करतात. हा आमच्या एका कामजाचा भाग आहे. त्यांनी सांगितले की, सुमारे एक आठवड्यापूर्वी आम्ही येथे भाताची लावणी केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.