मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. देशवासीयांना संबोधित करताना मोदींनी हा निर्णय घोषित केला आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांच्या घरी जावं, शेतात जाऊन काम सुरू करावं, एक नवी सुरुवात करावी, असं आवाहन मोदींनी केलं. राजधानी दिल्लीच्या सीमारेषेवर गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला यश आलं. त्यामुळे, हा शेतकऱ्यांचा विजय असल्याची भावना देशभरातून व्यक्त होत आहे. मात्र, मोदींच्या घोषणेनंतरही हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे किसान एकता आंदोलनाचे प्रमुख राकेश टीकैत यांनी म्हटलं आहे.
दिल्लीतील सीमारेषेवर आंदोलनस्थळी शेतकऱ्यांनी जल्लोष केला आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी एकमेकांना जिलबी वाटून आपला आनंद व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांच्या विजयाचं देशभरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे. मात्र, तात्काळ आंदोलन वापस घेत नसल्याचं किसान एकता आंदोलनाचे प्रमुख राकेश टीकैत यांनी म्हटलं आहे.
मोदींचं आंदोलक शेतकऱ्यांना भावनिक आवाहन
देशात आज गुरुनानकांचं पवित्र प्रकाश पर्व आहे. ही वेळ कुणालाही दोष द्यायची नाही. आज मी पूर्ण देशाला हे सांगायला आलो आहे की, आम्ही तीन कृषी कायद्यांना मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महिनाअखेरीस सुरू होणाऱ्या संसद अधिवेशनात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करू. आंदोलक शेतकऱ्यांना मी विनंती करतो की आज पवित्र दिवस आहे. शेतकऱ्यांनो आपापल्या घरी परत जा, शेतात जा, परिवाराकडे जा. नवी सुरुवात करू या, असे भावनिक आवाहनही मोदींनी आंदोलक शेतकऱ्यांना केलंय.