ऑनलाइन लोकमत
डेहराडून, दि. २२ - कॅश फॉर व्होट स्टिंग ऑपरेशन प्रकरणात उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांना सीबीआयने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. सीबीआयने त्यांना येत्या मंगळवारी चौकशीसाठी हजर होण्यास सांगितले आहे. विश्वासदर्शक ठरावापूर्वी आमदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी हरीश रावत यांनी लाचेचा प्रस्ताव दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
सीबीआयने त्यांना नऊ मे रोजीच चौकशीला हजर रहाण्यासाठी समन्स बजावले होते. पण त्यावेळी त्यांनी मुदत वाढवून मागितली होती. २६ मार्चला काँग्रेसच्या नऊ बंडखोर आमदारांनी रावत यांचा स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ प्रसिद्ध केला. पैशांचा प्रस्ताव देऊन रावत यांनी आमचा पाठिंबा विकत घेण्याचा प्रयत्न केला असा आरोप या बंडखोर आमदारांनी केला.
केंद्राने २७ मार्चला उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केल्याने विश्वासदर्शक ठराव होऊ शकला नाही. विश्वासदर्शक ठरावात हरीश रावत यांनी बहुमत सिद्ध केल्यानंतर ११ मे रोजी केंद्र सरकारने उत्तराखंडमधून राष्ट्रपती राजवट हटवली. नऊ बंडखोर आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय न्यायालयाने कायम ठेवल्याने त्यांना विश्वासदर्शक ठरावात मतदान करता आले नाही. या विश्वासदर्शक ठरावापूर्वी न्यायालयीन लढाई झाली. न्यायालयाच्या निर्णयानंतर विश्वासदर्शक ठराव पार पडला.