- ऑनलाइन लोकमत
मंड्या, दि. 6 - कावेरी नदीचं पाणी तामिळनाडूला सोडण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरुन कर्नाटकमध्ये संघर्ष पेटला आहे. शेतकरी आणि काही संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. बंगळुरु - म्हैसूर हायवेवरही सुरु असलेल्या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी तामिळनाडूमधील शेतक-यांची परिस्थिती सुधारण्यासाठी पुढील 10 दिवस कावेरी नदीतून पाणी रोज 15 हजार क्युसेक्स पाणी सोडण्याचे आदेश दिले होते.
कावेरी नदीवरुन राजकारण सुरु झालं असून मुख्य केंद्र असलेल्या मंड्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु आहे. आंदोलकांनी अनेक ठिकाणी रस्त्यावर उतरुन जाळपोळ केली तसंच धरणा आंदोलन करत अनेक ठिकाणी वाहतूक अडवली. कावेरी नदी परिसरात कायदा - सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
आंदोलनकांनी सरकारी कार्यालयात घुसून तोडफोडदेखील केला आहे. अनेक सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचा-याची उपस्थिती कमी होती असं पोलिसांनी सांगितलं आहे. परिस्थिती चिघळत असल्याने कृष्णराजनगर धरण परिसरात प्रतिबंधक आदेश जारी करण्यात आले असून नऊ सप्टेंबरपर्यत प्रवेशही बंद करण्यात आला आहे.
म्हैसूरु आणि हस्सन जिल्ह्यातही आंदोलन झाले असून कर्नाटकने पाणी न सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे पुतळेही अनेक ठिकाणी जाळण्यात आले. सरकारने लोकांना शांत राहून कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केलं आहे.