- समीर मराठे / सुधीर लंके, श्रीनगर
‘पेलेट गनसे हमारे नौजवानोंके आॅँखो की लाईट चली गयी, आर्मीकी गोलियोंने ७० से जादा मासूम लोगों की जान ली, हजारो घायल हुए, कश्मीर घाटी को जन्नत से जहन्नम बना दिया.. क्या दिखाया मीडियाने?’लोकांच्या संतापाचा कडेलोट झालेला, शे-दोनशे लोकांच्या जमावानं ‘लोकमत टीम’ला घेरलेलं. त्यांचा संताप ओसंडून वाहत होता.काश्मीर खोऱ्यातल्या खेडोपाडी, श्रीनगर परिसरात ‘लोकमत टीम’ला हा अनुभव आला. खोऱ्यातील जनतेचा सरकार अन् माध्यमांवरही रोष आहे. अनेक ठिकाणी संतप्त तरुणांनी पत्रकारांवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी ठिकठिकाणी अक्षरश: पहारे लावले. स्थानिक माध्यमांपेक्षाही नॅशनल मीडिया व त्यातही टीव्ही चॅनेल्सबद्दल तीव्र प्रतिक्रिया आहेत. अनेक पत्रकारांना घटनास्थळी पोहोचणं अशक्य झालं असून, विविध स्त्रोतांकडून माहिती मिळवत वार्तांकन करण्याची वेळ आली आहे. ‘लोकमत’ची टीम अत्यंत संंवेदनशील अनंतनाग जिल्ह्यातील काझीगुंड परिसरात पोहोचली. तिथं जमावाने संशयी नजरेने घेराव घालत प्रश्नांचा भडीमार केला. ‘महिला, मुलांचा काय दोष होता? त्यांना लष्कराने का मारलं?, असं सांगत ‘आझादी’ची मागणी हे नागरिक करत होते. नावं व छायाचित्रं प्रसिद्ध झाल्यास सुरक्षा यंत्रणांकडून त्रास होतो, असे सांगत नागरिक बोलायलाही तयार नाहीत.‘नॅशनल मीडिया आर नॉट अलाऊड’श्रीनगरमधील श्री महाराजा हरिसिंग हॉस्पिटल (एसएमएचएस) हे काश्मीर खोऱ्यातील सर्वात मोठे सरकारी हॉस्पिटल आहे. पेलेट गनमुळे दृष्टी गेलेल्या शेकडो तरुणांच्या डोळ्यांवर येथे उपचार सुरू आहेत. डोळे गमावलेले खेड्यापाड्यांतील अनेक तरुण रोज येथे भरती होत आहेत. या वार्तांकनासाठी पत्रकार इथं मोठ्या संख्येनं येतात. मात्र हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावरच ‘नॅशनल मीडिया आर नॉट अलाऊड’ असा फलक संतप्त नागरिकांनी लावला आहे. येथे पत्रकारांना मारहाणीच्या घटनाही घडल्या आहेत. ‘टीम लोकमत’ने येथे पोहोचत रुग्णांचं गाऱ्हाणं समजून घेतलं. टीव्ही चॅनल्सवर बंदी श्रीनगरचे प्रशासनही माध्यमांवर नजर ठेवून आहे. हिंसाचार उफाळू नये म्हणूून प्रादेशिक चॅनल्सचे प्रसारण आणि प्रक्षेपण बंद करण्याची नोटीस श्रीनगर जिल्हा प्रशासनानं केबल आॅपरेटर्सना पाठविली आहे. केबीसी, गुलिस्तॉँ, मुन्सिफ, जेके चॅनेल आणि इन्साफ टीव्ही यांचं प्रसारण रोखण्यास सांगण्यात आलं आहे.