होशियारपूर/अमृतसर (पंजाब) : संयुक्त किसान मोर्चाने (एसकेएम) शुक्रवारी “काळा दिवस” पाळला आणि राज्याच्या दोन सीमेवर तळ ठोकून आंदोलक शेतकऱ्यांवर हरयाणा पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ भाजप नेत्यांचे पुतळे जाळले. दरम्यान, हरयाणातील हिसारमधील खेडी चौपाटा येथे आंदोलक शेतकरी आणि पोलिस यांच्यात झालेल्या संघर्षात शुक्रवारी एक पोलिस अधिकारी जखमी झाला.
हरयाणातील हिसारमधील खेडी चौपाटा येथे आंदोलक शेतकरी आणि पोलिस यांच्यात झालेल्या संघर्षात शुक्रवारी एक पोलिस अधिकारी जखमी झाला. शेतकऱ्यांना पंजाब सीमेवर खनौरीकडे मोर्चा काढण्यापासून रोखल्यानंतर परिस्थिती चिघळली. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्ज केला, तर आंदोलकांनी दगडफेक केली.
हरयाणा पोलिस आणि पंजाबमधील शेतकरी यांच्यात झालेल्या संघर्षात मरण पावलेल्या शुभकरण सिंग याच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी एसकेएमने ‘काळा दिवस’ पाळण्याची हाक दिली होती.
मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
शुभकरण याच्या मृत्यूच्या निषेधार्थ पंजाबच्या १७ जिल्ह्यांमध्ये ४७ ठिकाणी निदर्शने केली. अमृतसरमध्ये शहरातील न्यू गोल्डन गेट येथे केंद्र सरकारचा पुतळा जाळला.
एसकेएमचे नेते रतन सिंग रंधावा म्हणाले की, सीमेवरील विविध गावांमध्ये निदर्शने करण्यात आली.
लुधियानामध्ये एसकेएम आणि कामगार संघटनांच्या सदस्यांनी एकत्रितपणे मिनी सचिवालयाबाहेर निदर्शने करीत पुतळे जाळण्यात आले. आंदोलकांनी मंत्र्यांच्या राजीनाम्याची आणि सिंग याच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. होशियारपूर जिल्ह्यातही अशीच निदर्शने झाली.
शेतकऱ्याचा अटॅकने मृत्यू
खनौरी येथे आंदोलनात सहभागी झालेल्या ६२ वर्षीय शेतकरी दर्शन सिंग यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, असे शेतकरी नेते सरवन सिंग पंढेर यांनी सांगितले. दर्शन सिंग हे मूळचे भटिंडा जिल्ह्यातील अमरगढ गावचे रहिवासी होते.
गुन्हा नोंदवा, तरच शुभकरणवर अंत्यसंस्कार करणार
पंजाब सरकार दोषींवर गुन्हा दाखल करत नाही, तोपर्यंत हरयाणा पोलिस आणि पंजाबमधील शेतकरी यांच्यातील संघर्षात मरण पावलेल्या शुभकरण सिंग याच्यावर अंत्यसंस्कार होणार नाही, अशी भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतल्याने पेच निर्माण झाला आहे. अनेक शेतकरी रस्त्यावर येत यासाठी आंदोलन करत आहेत.
शुभकरणच्या बहिणीला एक कोटीची भरपाई, नोकरी जाहीर
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शुक्रवारी खनौरी सीमेवर मृत्युमुखी पडलेल्या शुभकरण सिंग याच्या बहिणीला १ कोटी रुपयांची भरपाई आणि सरकारी नोकरी जाहीर केली आहे. दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.