उत्तराखंडच्या हल्द्वानीमध्ये प्रचंड दगडफेक, जाळपोळ; दंगेखोरांना गोळ्या घालण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 08:12 PM2024-02-08T20:12:35+5:302024-02-08T20:13:14+5:30
ट्रान्सफॉर्मरला देखील आग लावल्याने परिसरातील वीज गेली आहे. यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांसह पत्रकारही अडकून पडले आहेत.
उत्तराखंडमधील हल्द्वानीमध्ये अनधिकृत मशीद आणि अतिक्रमणे तोडण्यात येत आहेत. यावर कारवाईसाठी बुलडोझर वापरण्यात येत आहे. अतिक्रमण हटाव मोहिम सुरु असताना संतप्त जमावाने अधिकाऱ्यांवर दगडफेक केली आहे. तसेच पोलीस ठाण्याला घेरून आजुबाजुच्या परिसरातील गाड्या जाळण्यात आल्या आहेत.
हल्द्वानीच्या बनभूलपुरा भागात नगर पालिकेने ही कारवाई सुरु केली आहे. यावेळी एका बागेतील मदरसा आणि मशीदीवर बुलडोझर चालविण्यात आला. पालिकेने पोलीस बंदोबस्तही मागविला होता. काही समाज कंटकांनी या कारवाईवेळी पोलीस प्रशासन आणि पत्रकारांवर दगडफेक केली. यामध्ये एसडीएम अधिकाऱ्यासह अनेक पोलीस आणि पत्रकार जखमी झाले आहेत.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या प्रकरणावर चर्चेसाठी उच्च स्तरीय बैठक बोलावली असून बनभूलपुरा पोलीस ठाण्याला चारी बाजुंनी समाजकंटकांनी घेरले आहे. या पोलीस ठाण्यावर जोरदार दगडफेक करण्यात आली आहे. अनेक गाड्यांना आग लावण्यात आली आहे. ट्रान्सफॉर्मरला देखील आग लावल्याने परिसरातील वीज गेली आहे. यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांसह पत्रकारही अडकून पडले आहेत.
परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांची कुमक मागविण्यात आली आहे. तसेच आत अडकलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी हवेत गोळीबार केला आहे. तोडकाम करण्यास सुरुवात करताच महिला आणि तरुणांनी विरोध करण्यास सुरुवात केली होती. यानंतर अचानक दगडफेक करण्यात आली.