बंगळुरू : रामनवमीनिमित्त (Ram Navami)काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीवर दगडफेक झाल्यानंतर कर्नाटकातील कोलारमध्ये तणाव निर्माण झाला. येथे रामनवमीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी काही उपद्रवी घटकांनी दगडफेक केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, नुकतेच राजस्थानमधील करौली येथे हिंदू समाजाच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती.
रामनवमीच्या मुहूर्तावर शोभा यात्रा काढण्यात येत होती. ही यात्रा जहांगीर मोहल्ला (Jahangir Mohalla) येथून जात असताना काही उपद्रवी घटकांनी दगडफेक केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे. दरम्यान, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. तसेच, याप्रकरणी 4 ते 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
करौली येथेही घडली होती अशी घटना राजस्थानमधील करौली शहरात नवसंवत्सरनिमित्त काढण्यात आलेल्या बाइक रॅलीनंतर हिंसाचार उसळला होता. काही समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीमुळे जातीय तेढ निर्माण झाल्याने मुस्लिमबहुल परिसरात जाळपोळ आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या. यादरम्यान रॅलीत सहभागी लोकांवर जोरदार दगडफेक सुरू झाली. यासोबतच सुमारे 100-150 जणांनी लाठ्या-काठ्या घेऊन हल्ला केला. या हल्ल्यात 8 पोलिसांसह 11 जण जखमी झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 23 जणांना अटक केली आहे. सध्या पुढील तपास सुरू आहे.