श्रीनगर- रमजान ईदच्या दिवशी जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार झाला. नियंत्रण रेषेजवळ जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघट करण्यात आलं. पाकिस्तानच्या गोळीबारात लष्करातील जवान बिकास गुरुंग शहीद झाले आहेत. राजधानी श्रीनगरसुद्धा अशांत आहे. शनिवारी सकाळी नमाज अदा करून येत असताना सुरक्षा रक्षकांना निशाणा बनविण्यात आलं.
दक्षिण काश्मीरच्या अनंतनागमध्ये ईद निमित्त नमाज अदा केल्यानंतर काही लोकांनी सुरक्षा दलाच्या ताफ्यावर अचानक दगडफेक केली. दगडफेक करणाऱ्यांच्या हातात पाकिस्तान आणि आयएसचे झेंडे होते. यावेळी जमावाने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत दगडफेक केली. प्रचंड जमावाने दगडफेक सुरू केल्याने सुरक्षा दलाने लगेचच अश्रुधूराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही जमावाची दगडफेक सुरूच राहिल्याने सुरक्षा दलाला हवेत गोळीबार करावा लागला. त्यामुळे अनंतनागमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानच्या गोळीबारात लष्करातील एक जवान शहीद झाला. तसंच अरनिया सेक्टरमध्ये शनिवारी सकाळी चार वाजता पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लघन करण्यात आलं. याला बीएसएफनेही चोख प्रत्युत्तर दिलं.