श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये गुरुवारी (1 नोव्हेंबर) सकाळी चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. मात्र खात्म्यानंतर संतप्त स्थानिकांनी सुरक्षादल आणि माध्यम प्रतिनिधींवर दगडफेक केली आहे. दगडफेक करणाऱ्यांमध्ये महिलांचा आणि तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता.
Jammu Kashmir : बडगाममध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा
लष्काराने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी स्थानिकांना चिथावत होते. पंचायत निवडणुकांमध्ये अडथळे निर्माण करत होते. त्यांच्याकडून दोन एके-47 आणि एक पिस्तुल जप्त केल्याचे कर्नल एके नाईक यांनी सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून जम्मू-काश्मीरमध्ये अशाप्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दहशतवाद्यांसोबत सुरक्षदलाची चकमक सुरू असल्यास स्थानिकांकडून दगडफेक केली जाते.
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पहाटेपासून चकमक सुरू झाली. बडगाममध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून चकमकीदरम्यान संपूर्ण परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून कडेकोड सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
जवानांनी स्नायपर्सला घातले कंठस्नान, दहशतवादी मसूद अझरच्या भाच्याचा खात्मा
जम्मू-काश्मीरमध्ये मंगळवारी रात्री (30 ऑक्टोबर) जवानांना मोठं यश आलं होतं. लष्कराच्या जवानांनी पुलवामातल्या त्रालमध्ये जैश ए मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यात पाकिस्तानच्या स्नायपरचाही समावेश आहे. विशेष म्हणजे हा स्नायपर दहशतवादी मसूद अझरचा भाचा आहे, अशीही माहिती समोर आली. मंडुरा येथे दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. तेव्हा त्याचा खात्मा करण्यात आला. हा भाग दक्षिण काश्मीरमध्ये येतो.