गुजरातमधील खेडामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित गरबा कार्यक्रमात दगडफेक करण्यात आली. ज्यामध्ये सहाजण जखमी झाले आहेत. तर दुसरीकडे सावली परिसरात दोन गट आपापसात भिडले. यानंतर दगडफफेक करण्यात आली. यामुळे गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पोलिसांनी दोन्ही गटातील जवळपास 40 लोकांना अटक केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणांचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, खेडा येथे गरबा कार्यक्रमादरम्यान इतर समाजाच्या काही लोकांनी गोंधळ केल्यावर दगडफेक केली, ज्यात 6 जण जखमी झाले. कच्छ जिल्ह्यातील खेडा येथे गरबा कार्यक्रमात काही लोकांनी घुसून गोंधळ घातला. एसपी राजेश गोधिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आरिफ आणि जाहिर नावाच्या दोन व्यक्तींच्या नेतृत्वाखाली काही लोक नवरात्री गरबा स्थळी पोहोचले आणि अडथळे निर्माण करण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांनी दगडफेक केली."
सावली शहरात झेंड्यावरून वाद
अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेत 6 जण जखमी झाले आहेत. आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तणावाच्या पार्श्वभूमीवर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वडोदरातील सावली शहरात झेंड्यावरून वाद झाला. सावलीतील भाजी मंडईत दगडफेकीनंतर 40 हून अधिक जणांना पकडण्यात आले आहे. वडोदरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गटाने विद्युत खांबांवर झेंडे लावले होते. येथून जवळच एक मंदिर देखील आहे.
हाणामारी अन् दगडफेक, 40 जणांना अटक
काही स्थानिक लोक त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचे सांगण्यासाठी गेले असता हाणामारी झाली. दोन्ही बाजूंच्या वादानंतर दगडफेक सुरू झाली. यादरम्यान अनेक वाहनांचे येथे नुकसान झाले. एफआयआर नोंदवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. एका बाजूचे 25 तर दुसरीकडे 15 जणांना अटक करण्यात आली आहे. परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.