हैदराबाद : येथे एका पशुवैद्यकीय डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून नंतर तिला जाळून मारणा-या चार आरोपींना स्थानिक न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून, दिल्लीतील निर्भया प्रकरणाची आठवण करून देणा-या या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी आरोपींना तुरुंगात घेऊन जाणा-या पोलिसांच्या वाहनावर तुफान दगडफेक केली. आरोपींना आमच्या हवाली करा, अशी मागणी जमाव करीत होता.
हैदराबादेतील वातावरण स्फोटक बनले आहे. आरोपींना ठेवलेल्या शादनगर पोलीस ठाण्याबाहेर संतप्त लोक जमले होते. त्यामुळे आरोपींना न्यायालयात नेणे पोलिसांना शक्य झाले नाही. त्याऐवजी कार्यकारी न्यायदंडाधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलाविले गेले. न्यायदंडाधिका-यांनी तेथे आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
चार आरोपींना घेऊन पोलीस तुरुंगाकडे जायला निघाले तेव्हा लोकांनी पोलिसांचे वाहन अडवून आरोपींना आपल्या स्वाधीन करण्याची मागणी करीत दगडफेक केली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना बळाचा सौम्य वापर करावा लागला. तेलंगणातील अनेक शहरांत विद्यार्थी आणि इतर संघटना तसेच नागरिकांनी निदर्शने केली.