नवी दिल्ली : न्यायालयीन कामकाजादरम्यान वकिलांनी वारंवार आपल्याला 'माय लॉर्ड' आणि 'युवर लॉर्डशिप' असे संबोधल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली आहे. "तुम्ही किती वेळा 'माय लॉर्ड्स' म्हणणार? तुम्ही हे बोलणं बंद केला तर मी तुम्हाला माझा अर्धा पगार देईन", असे न्यायाधीश पी. एस. नरसिंह यांनी बुधवारी एका नेहमीच्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान वरिष्ठ वकिलाला म्हटले.
न्यायाधीश ए. एस. बोपण्णा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठात न्यायाधीश पी. एस. नरसिंह यांचा समावेश आहे. न्यायालयात वरिष्ठ वकिलांना न्यायाधीश पी. एस. नरसिंह म्हणाले, "तुम्ही त्याऐवजी 'सर' का वापरत नाही?" तसेच, वरिष्ठ वकिलांनी 'माय लॉर्ड्स' शब्द किती वेळा उच्चारले, ते मोजावे लागेल, असेही पी. एस. नरसिंह यांनी सांगितले.
दरम्यान, युक्तिवादाच्यावेळी वकील नेहमी न्यायाधीशांना 'माय लॉर्ड' किंवा 'युवर लॉर्डशिप' म्हणून संबोधतात. जे लोक या प्रथेला विरोध करतात, ते सहसा याला वसाहतवादी काळातील अवशेष आणि गुलामगिरीचे लक्षण म्हणतात. तसेच, बार कौन्सिल ऑफ इंडियाने (BCI) २००६ मध्ये एक ठराव पारित केला होता, ज्यामध्ये कोणताही वकील न्यायाधीशांना 'माय लॉर्ड' आणि 'युवर लॉर्डशिप' म्हणून संबोधित करणार नाही. परंतु कामकाजादरम्यान त्याचे पालन होऊ शकले नाही.