ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - हिजबूल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीला शहीद बनवण्याचा प्रयत्न करु नका असं सांगत भारताने पाकिस्तानला सुनावलं आहे. गतवर्षी 8 जुलै रोजी भारतीय लष्कराच्या जवानांनी बुरहान वानीचा खात्मा केला होता. बुरहान वानीचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करणा-या पाकिस्तान सरकारला भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बागले यांनी खडे बोल सुनावले आहेत.
आणखी वाचा
"आधी पाकिस्तानचं परराष्ट्र मंत्रालय जे लष्कर-ए-तोयबा सांगायचं तेच बोलत होतं. आता पाकिस्तानचे लष्कर प्रमुख बुरहान वानीचं उदात्तीकरण करत आहेत. पाकिस्तानकडून मिळणा-या दहशतवाद समर्थनाचा सर्वांनी निषेध करायला हवा", असं ट्विट गोपाळ बागले यांनी केलं आहे.
First @ForeignOfficePk read frm banned LeT's script. Now Pak COAS glorfs Burhan Wani. Pak's terror suprt&spnsr'p need 2b condmnd by 1 & all— Gopal Baglay (@MEAIndia) July 9, 2017
पाकिस्तान लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी दहशतवादी बुरहान वानीचं कौतुक केलं होतं. इतकंच नाही तर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरिफ यांनीदेखील बुरहान वानीला श्रद्धांजली वाहिली. त्याचा मृत्यू काश्मीर खो-यातील स्वातंत्र्याच्या लढाईल बळ देईल असंही ते बोलले होते. याच पार्श्वभुमीवर गोपाळ बागले यांनी हे वक्तव्य केलं आहे.
जर्मनीतील जी20 परिषदेत दहशतवादाविरोधात भूमिका मांडण्यात आल्यानंतर पाकिस्तानने बुरहान वानीचं कौतुक केलं आहे. जर्मनीतील हॅम्बर्ग येथे सुरू असलेल्या जी-20 संमेलनातील सर्व नेत्यांनी दहशतवादाविरोधात आपली स्पष्ट भूमिका मांडली होती. संमेलनाच्या शेवटी प्रसिद्ध करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात जी-20 नेत्यांनी जगभरातील दहशतवादी कारवायांचा तीव्र शब्दात निषेध केला होता. तसेच दहशत आणि दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवणाऱ्यांविरोधात एकजूट करण्याची घोषणा केली होती.
दरम्यान, पाकिस्तानने सलग दुस-या दिवशी शस्त्रसंधी उल्लंघन केल्याचा आरोप करत इस्लमाबादमधील भारतीय उप-उच्चायुक्तांना समन्स बजावला आहे. नियंत्रण रेषेवर भारताकडून शस्त्रसंधी उल्लंघन केलं असून, फायरिंगमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. चिरीकोट आणि सतवाल सेक्टरमध्ये शनिवारी भारतीय जवानांकडून करण्यात आलेल्या फायरिंगमध्ये तीन सामान्य लोकंचा मृत्यू झाल्याचाही दावा करण्यात आला होता.
पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाचे डायरेक्टर जनरल (दक्षिण आशिया आणि सार्क) मोहम्मद फैसल यांनी हे समन्स बजावलं असून, भारतीय जवानांकडून करण्यात आलेल्या गोळीबाराचा निषेध केला आहे. भारतीय जवान जाणुनबुजून स्थानिकांना टार्गट करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भारतीय अधिका-यांनी मात्र पाकिस्तानचा दावा फेटाळून लावत पुंछ आणि कृष्णघाटी सेक्टरमध्ये सर्वात आधी पाकिस्तान जवानांनी गोळीबार सुरु केला होता, आम्ही फक्त प्रत्युत्तर दिलं असं सांगितलं आहे. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात दोन भारतीयांचा मृत्यू झाला असून, भारताने यासंबंधी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.